Join us

Maharashtra Politics: “राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेने भाजप डचमळलाय, २०२४ ला नक्कीच बदल होईल?”

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 8:39 AM

Maharashtra News: काँगेसला वगळून किंवा काँग्रेसला लांब ठेवून विरोधी आघाडी करता येणे शक्य नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.

Maharashtra Politics: भारतीय जनता पक्ष राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेने डचमळला आहे. यात्रा विस्कळीत व्हावी म्हणून कोरोनाचे भय घातले, पण विरोधी पक्षाला दचकायला काय झाले? समस्त विरोधी पक्ष एकदिलाने एकत्र येण्याची हीच वेळ आहे. प. बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, बिहार, केरळ, राजस्थान अशा राज्यांनी मनावर घेतले तर इतर राज्यांतही जागरण होईल. प्रत्येकालाच नव्या स्वातंत्र्याची व क्रांतीची मशाल पेटवायची आहे, पण लोकनायक जयप्रकाश नारायण होणे आता सोपे नाही. डोके ठिकाणावर ठेवून जमिनीवरील सत्य समजून पावले टाकावी लागतील. तसे घडले तर २०२४ ला नक्कीच बदल होईल, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी ४०० दिवस उरलेत, असे मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितले. देशातील विरोधी पक्षांनासुद्धा तोच इशारा आहे! देशातील विरोधी पक्षांची नेमकी दिशा काय, असा प्रश्न आता पडला आहे. विरोधकांनी समन्वयाची भूमिका घेतली नाही त्याचे हे फळ. विषय फक्त निवडणुकांचा नाही, तर देशात फोफावलेल्या हुकूमशाही प्रवृत्तीचा आहे. न्यायव्यवस्थेपासून देशातील सर्वच प्रमुख स्तंभांवर हल्ले सुरू आहेत. संविधान, न्यायालयाचेही खासगीकरण सुरू असताना विरोधकांची तोंडे दहा दिशांना कशी राहू शकतात? अशी विचारणा शिवसेनेने सामना अग्रलेखातून केली आहे. 

काँग्रेसची भीती त्यांना का वाटावी?

राष्ट्रीय राजकारण करू पाहणारे हे सर्वच पक्ष प्रांतीय आहेत व त्यांना काँग्रेसला दूर ठेवायचे आहे. काँग्रेसची भीती त्यांना का वाटावी? काँग्रेस पक्षाच्या खासदारांचा आकडा ‘शंभर’ पार करणे गरजेचे आहे व आज ही क्षमता फक्त काँगेसमध्येच आहे. काँगेस शंभर पार झाली की दिल्लीतील सध्याचा डोलारा सहज कोसळेल. याचे भान राष्ट्रीय राजकारणात उडी मारणाऱ्या प्रत्येकाने ठेवायला हवे. केजरीवाल यांच्या पक्षाने पंजाब व गुजरातेत काँग्रेसला ओरबाडून खाल्ले. त्यांनी भाजपास ओरबडायला हवे होते. तसे झाले असते तरच ते खरे राष्ट्रपुरुष ठरले असते, असे शिवसेनेने म्हटले आहे.  

भाजपच्या विरोधकांना भय का वाटावे?

राहुल गांधी यांची देशातील हुकूमशाही प्रवृत्तीविरुद्ध जी ‘भारत जोडो’ यात्रा सुरू आहे, ती दिल्ली व लखनौला पोहोचली तेव्हा याच लोकांनी त्या यात्रेकडे पाठ फिरवली होती. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेस लोकांचे समर्थन मिळत आहे याचे भय भाजपास वाटायला हवे, भाजपच्या विरोधकांना का वाटावे? काँगेस पक्षाशी आमचे वैचारिक मतभेद असू शकतात, पण ज्या भाजपशी आमचे वैचारिक मतभेद नव्हते, त्या भाजपने देशात असे काय दिवे लावले? असा सवाल शिवसेनेने केला आहे. 

दरम्यान, काँगेसला वगळून किंवा काँग्रेसला लांब ठेवून विरोधी आघाडी करता येणे शक्य नाही. जे अशा विचाराने मेळावा भरवून राष्ट्रीय राजकारणाचा एल्गार करीत आहेत, ते एकप्रकारे भारतीय जनता पक्षाचा २०२४ चा मार्ग मोकळा करीत आहेत. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेसही प्रचंड गर्दी राज्याराज्यांत होत आहे, पण गर्दी झाली तरी काँगेस पक्ष जमिनीवर किती उरलाय, हे त्यांना पाहावे लागेल. राहुल गांधी यांनी साडेचार हजार किलोमीटरची पदयात्रा केली. त्यांच्या भारत भ्रमणाचा शेवटचा टप्पा सुरू आहे. याचे कौतुक राष्ट्रीय राजकारणातील किती विरोधी पक्ष पुढाऱ्यांनी केले? असा सवाल करण्यात आला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत जोडो यात्राकाँग्रेसशिवसेनाभाजपा