2014 चा राजकीय अपघात 2019 मध्ये होणार नाही- उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 07:27 AM2018-06-19T07:27:58+5:302018-06-19T08:33:07+5:30
52 व्या वर्धापनादिनी शिवसेनेचं भाजपावर शरसंधान
मुंबई: देशातलं वातावरण बदलत आहे. २०१४ चा राजकीय अपघात २०१९ मध्ये होणार नाही, अशा शब्दांमध्ये शिवसेनेकडून भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे. महाराष्ट्रावर शिवसेनेची स्वबळावर सत्ता येईल आणि दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचं, याचा निर्णय घेणारी ताकद राष्ट्रीय पातळीवर शिवसेना निर्माण करेल, अशी गर्जनादेखील 'सामना'मधून करण्यात आली आहे. आज शिवसेनेचा 52 वा वर्धापनदिन आहे.
देशातील परिस्थिती 'ऑल इज वेज' नसल्याचं शिवसेनेनं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून म्हटलं आहे. 'देशात आज ‘आणीबाणी’पूर्व परिस्थिती आहे काय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काश्मीरात जवानांच्या हत्या होतच आहेत. लोकांनी बहुमताने निवडून दिलेल्या सरकारचा गळा राजधानी दिल्लीतच आवळला जात आहे. नोकरशाहीचा हम करे सो कायदा सुरूच राहिला तर निवडणुका लढणं व राज्य चालवणं मुश्कील होईल. धुळीचे लोट फक्त दिल्लीतच नव्हे, तर देशभरातच उठले आहेत. मोदी हे सतत परदेशात असल्यानं त्यांच्या डोळ्यात व श्वासात धुळीचे कण जात नसावेत, पण जनता बेजार आहे. अडचणीत आहे,' अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं भाजपावर शरसंधान साधलं आहे.
मुंबईतील अनेक भागांची नाव बदलून मुंबई नासवण्याचं काम सुरू असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. 'पैसा व सत्तेचा विषप्रवाह मुंबईसह महाराष्ट्राचं रूप बदलू पाहत आहे. मुंबई नासवण्याचं कारस्थान रचलं आहे. ‘बॉम्बे’चं मुंबई केलं याची पोटदुखी असणाऱ्यांनी मुंबईतील अनेक नगरे-उपनगरांची नावं परस्पर बदलण्याचा सपाटा लावला आहे. त्यांच्या पाठीवर धपाटा मारला जाईल. परळ, दादर, गिरगाव, वडाळा व शीव, भायखळा, चिंचपोकळी ही त्याच नावानं ओळखली जातील. ज्यांना या ‘गावां’ची नावं बदलून अप्पर वरळी, न्यू कफ परेड वगैरे करून ‘बाजार’ मांडायचा आहे, त्यांनी आधी आपल्या बापांची नावं बदलून यावं,' अशी खरमरीत टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.