‘जुमल्यां’च्या ‘जुलूमा’चा २०१९ मध्ये स्फोट होईल; उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 08:03 AM2018-06-22T08:03:48+5:302018-06-22T08:12:58+5:30
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन उद्धव ठाकरेंचं शरसंधान
मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण का वाढतंय, याचा विचार न करता मोदी सरकार पुनः पुन्हा तेच ते जुमले ऐकवत सुटलं आहे. ‘जुमल्यां’च्या या ‘जुलूमा’चा स्फोट २०१९ मध्ये होईलच, अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं पुन्हा एकदा मोदी सरकारवर तोफ डागली आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील 600 शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करु, असं आश्वासन दिलं होतं. या आश्वासनात नवीन काय? असा सवाल शिवसेनेनं 'सामना'मधून उपस्थित केला आहे.
शिवसेनेनं मोदी सरकारच्या घोषणाबाजीवर सडकून टीका केली आहे. 'वारेमाप घोषणा, तीच ती जुमलेबाजी याचा देशातील जनतेला वीट आला आहे. तरीही राज्यकर्ते भानावर यायला तयार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशभरातील शेतकऱयांशी संवाद साधला. देशातील ६००हून अधिक जिल्हय़ांतील शेतकरी पंतप्रधानांचे भाषण ऐकत होते. शिवाय थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून करोडो शेतकरी पंतप्रधान काहीतरी ठोस आश्वासन देतील, किमानपक्षी नवीन जुमला तरी ऐकवतील अशी भाबडी आशा बाळगून टीव्हीसमोर बसले होते, मात्र त्यांचा भ्रमनिरासच झाला. ‘२०२२ पर्यंत शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणार’, अशी गर्जना मोदी यांनी शेतकऱयांशी बोलताना केली. यात नवे ते काय?,' असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करु, याच आश्वासनावर भाजपानं 2014 मध्ये निवडणूक जिंकली होती. मात्र चार वर्ष सरकारनं शेतकऱ्यांकडे दुर्लक्षच केलं, अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं शरसंधान साधलं आहे. 'उत्पन्न दुप्पट करण्याच्या आश्वासनावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी काँग्रेसला सत्तेतून बेदखल केले आणि भाजपचे खासदार दुपटीने वाढवून त्यांना सत्तेवर आणले. भाजपचे पीक जोमात वाढले आणि देशातील शेतकरी आणि शेतीचे क्षेत्र मात्र कोमात गेले. हे वास्तव आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, या आश्वासनाला आता चार वर्षे उलटली. प्रत्यक्षात शेती आणि शेतकरी मात्र आहे तिथेच आणि आहे तसाच आहे. किंबहुना, पूर्वीपेक्षाही बिकट म्हणावी अशी परिस्थिती या राजवटीत झाली आहे. जी घोषणा देऊन हे सरकार सत्तेवर आले ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी म्हणजेच शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारने मागच्या चार वर्षांत काय केले आणि शेतकऱयांच्या आयुष्यात खरोखरच ‘अच्छे दिन’ आले आहेत काय हे खरेतर पंतप्रधानांनी सांगायला हवे होते, मात्र ‘शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणार’ ही जुन्याच आश्वासनाची ‘कॅसेट’ वाजवून पंतप्रधान मोकळे झाले,' अशी टीका शिवसेनेनं केली आहे.