Join us

मोदींनी इंग्रजांसारखं पलायन केलं; शिवसेनेचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 10:45 AM

जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरुन शिवसेनेचा मोदींवर बाण

मुंबई: जम्मू-काश्मीरमध्ये राज्य करणं कठीण होऊस बसल्यावर सर्व खापर मेहबूबा मुफ्तींवर फोडून भाजपानं गाशा गुंडाळला. इंग्रजांनीही अशाच पद्धतीनं देश सोडला होता, अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं पंतप्रधान मोदींवर घणाघात केला आहे. नोटाबंदी करण्यामागे दहशतवाद मोडून काढण्याचंही एक कारण सांगितलं गेलं. मग आता पीडीपीसोबतच्या सरकारमधून बाहेर पडताना त्याच दहशतवादाच्या नावाने बोटं का मोडत आहात?, असा सवालदेखील शिवसेनेनं उपस्थित केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान साधण्यात आलं आहे. भाजपानं पीडीपीसोबतची आघाडी तोडत जम्मू-काश्मीरमधील सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यावरुन शिवसेनेनं मोदी आणि भाजपाचा समाचार घेतला आहे. 'कश्मीर खोऱ्यात अराजक निर्माण करून भारतीय जनता पक्षाने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कश्मीरची हालत इतकी कधीच बिघडली नव्हती, रक्ताचे पाट असे कधीच वाहिले नव्हते. हिंदुस्थानी जवानांचे बळी इतक्या मोठय़ा संख्येने कधीच गेले नव्हते. कश्मीरात हे भयंकर प्रकार भाजप राजवटीत घडले, पण या सगळ्याचे खापर मेहबुबा मुफ्तीवर फोडून भाजप साळसूदपणे सत्तेच्या बाहेर पडला आहे. कश्मीरात मेहबुबांबरोबर सत्ता स्थापन करणे हा मूर्खपणाचा आणि फाजील साहसाचाच निर्णय होता, पण देशातील एक राज्य आम्ही मिळवत आहोत. आम्ही अजिंक्य व अपराजित आहोत, आमचे उधळलेले घोडे सारा देश पादाक्रांत करतील या हावरेपणातून कश्मीरात पीडीपीबरोबर सत्ता स्थापन केली. त्याची फार मोठी किंमत देशाला, सैनिकांना व कश्मीरच्या जनतेला चुकवावी लागली आणि त्याबद्दल इतिहास भाजपला माफ करणार नाही,' अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं मोदी आणि भाजपावर तोफ डागली आहे. 'कश्मीरातील जनता रस्त्यावर उतरते व सैनिकांवर हल्ले करते. पाकिस्तानचे अतिरेकी घुसतात व आमच्या लष्करी तळांवर हल्ला करतात. रोज अनेक जवान शहीद होतात. निरपराध लोक मारले जातात व यावर देशाच्या सुविद्य संरक्षणमंत्री एखादे ट्विट करून सैनिकांना श्रद्धांजली वाहतात. पंतप्रधान सतत परदेशात असतात व कश्मीरचे नेमके काय करावे यावर पंतप्रधानांच्या मर्जीतील बाबू लोकांत चिंतन बैठक होते. एके दिवशी अचानक पंतप्रधानांचे विमान पाकिस्तानात उतरते, पंतप्रधान नवाज शरीफना भेटायला जातात व हिंदुस्थानातील भक्तगण ‘‘व्वा! व्वा! काय हा मास्टर स्ट्रोक. आता कश्मीर प्रश्न सुटलाच पहा’’ असे झांजा बडवून सांगतात. याला राज्य करणे म्हणत नाही. राज्य करणे म्हणजे पोरखेळ नव्हे. तसा पोरखेळ सध्या सुरू आहे,' अशी टीका सामनामधून मोदी सरकारवर करण्यात आली आहे.  

टॅग्स :नरेंद्र मोदीउद्धव ठाकरेभाजपाशिवसेनाभाजपा-पीडीपी