मुंबई:देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) वगैरे पुढारी बाळासाहेबांचे स्वप्न उराशी कवटाळून बसले आहेत. २०१४ मध्ये शिवसेनेशी युती तोडताना या महामंडलेश्वरांना बाळासाहेब आठवले नाहीत. २०१९ मध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेला शब्द तोडतानाही त्यांना बाळासाहेबांच्या स्वप्नांचे स्मरण झाले नाही. आता मोठे आले बाळासाहेबांचे स्वप्न साकार करायला! अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी या मायबापांना विसरले ते बाळासाहेबांचे स्वप्न कसले साकार करणार?, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेने भाजप आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.
शिवसेना म्हणजे जनतेची शक्ती आहे. ही शक्ती दुर्बल होऊ नये म्हणून आम्ही तळमळतो. हेच बाळासाहेबांचे स्वप्न आहे. शिंदे गटाचे मुख्यमंत्रिपद हा साबणाचा बुडबुडा आहे. महाराष्ट्रात चीड आहे, संताप आहे. आम्ही शिवसेनेच्या उपनेत्यांना महाराष्ट्रात पाठवलं आहे. आदित्य चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरत आहे. लोकांचा प्रचंड प्रतिसाद त्याला मिळत आहे. लवकरच आम्ही स्वतः महाराष्ट्र पिंजून नव्हे तर घुसळून काढणार आहोत. गद्दारांना त्यांची जागा दाखवून देऊच, पण शिवसेना फोडणाऱ्यांनाही याच जमिनीत गाडून दाखवू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. सामना अग्रलेखातून शिवसेनेने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
शिवरायांचा महाराष्ट्र आहे, असे बोलायचे व कृती औरंगजेबाची
शिवरायांचा महाराष्ट्र आहे असे तोंडाने बोलायचे व कृती औरंगजेबाची करायची. हे धंदे चालणार नाहीत. मुंबई गिळायची हे तुमचे स्वप्न शिवसेना पूर्ण होऊ देणार नाही. हेच बाळासाहेबांचे स्वप्न! घोडा मैदान लांब नाही. तोपर्यंत शिंदे गटाकडून तेल मालीश करून घ्या, असे आव्हान शिवसेनेने दिले आहे. तसेच फडणवीसांचे बोल हे लबाड कोल्ह्याचे आवतण आहे. मुंबई-ठाणेकरांनी सावध राहायला हवे. राज्यात फक्त थिल्लरपणा सुरू आहे. सत्य फक्त हेच आहे की, मुंबईतून मराठी एकजूट संपवायची आहे व त्यासाठी शिवसेनेवर घाव आणि घाव घालायचे आहेत. बाळासाहेबांचे स्वप्न वगैरे ही भाजपच्या तोंडची भाषा हे कारस्थान आहे, अशी टीका करण्यात आली आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे उचकी लागल्याप्रमाणे बाळासाहेबांच्या नावाचा जप करत आहेत. काय तर म्हणे, मुंबई महापालिकेत भाजपस मते द्या. आम्ही बाळासाहेबांचे स्वप्न साकार करू. काय हे ढोंग? बाळासाहेबांनी ढोंगाचा सदैव तिरस्कार केला. पण या मंबाजींना खरेच बाळासाहेब कळलेत का? बाळासाहेबांची कोणती स्वप्ने तुम्ही साकार करणार आहात? शिवसेनेत फूट पाडून व त्या बळावर मुंबईवरील भगवा उतरवण्याचे तुमचे स्वप्न हे काय बाळासाहेबांचे स्वप्न झाले? अशी विचारणाही शिवसेनेने केली आहे.