गोपाळ शेट्टींचं काय चुकलं?; उद्धव ठाकरेंचा भाजपा नेतृत्त्वाला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 07:11 AM2018-07-09T07:11:07+5:302018-07-09T07:11:32+5:30

मतपेटीसाठी भाजपा ख्रिस्ती समाजाला चुचकारत असल्याची टीका

shiv sena slams bjp leadership over gopal shettys remarks on christian community | गोपाळ शेट्टींचं काय चुकलं?; उद्धव ठाकरेंचा भाजपा नेतृत्त्वाला सवाल

गोपाळ शेट्टींचं काय चुकलं?; उद्धव ठाकरेंचा भाजपा नेतृत्त्वाला सवाल

googlenewsNext

मुंबई: भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांचं ख्रिश्चन समाजाबद्दलचं वादग्रस्त विधान आणि त्यावरुन भाजपा नेतृत्त्वानं त्यांना दिलेली समज यावरुन शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं आहे. गोपाळ शेट्टी यांचं काय चुकलं?, असा सवाल विचारत शिवसेनेनं 'सामना' या मुखपत्रातून भाजपा नेतृत्त्वावर शरसंधान साधलं आहे. '२०१९ च्या निवडणुकीत ख्रिश्चन बांधवांना चुचकारण्याचा हा प्रयोग आहे. भाजपचे हे ‘निधर्मी’ रूप आता स्पष्ट व प्रकाशमान होताना दिसत आहे,' अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं भाजपाला अप्रत्यक्षपणे 'हिंदुत्वा'ची आठवण करुन दिली आहे. 

दोन दशकांपूर्वी ओडिशात घडलेल्या घटनेची आठवण करुन देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपा नेतृत्त्वावर तोंडसुख घेतलं आहे. 'दोन दशकांपूर्वी ओडिशात आदिवासींची धर्मांतरं करणाऱ्या फादर स्टेन्सची त्याच्या मुलासह निर्घृण हत्या झाली, तेव्हा संपूर्ण ख्रिस्ती जग हादरले. ओडिशाचे त्यावेळचे मुख्यमंत्री जानकी वल्लभ पटनायक यांना काँग्रेस नेतृत्वानं तडकाफडकी हटवलं. ‘व्हॅटिकन चर्च’चा दबाव आला व ‘‘सोनिया गांधी या कॅथलिक असल्यामुळे इतक्या तडकाफडकी हटवलं’’ अशी टीका तेव्हा हिंदुत्ववाद्यांनी केली, पण आता गोपाळ शेट्टींच्या बाबतीत काय झालं? माफीसाठी, माघारीसाठी त्यांच्यावर पक्षांतर्गत दबाव आला. आता तर सत्तेत सोनिया गांधीही नाहीत व केंद्रानं ‘व्हॅटिकन’च्या दबावाखाली निर्णय घ्यावा अशी परिस्थितीदेखील नाही. तरी गोपाळ शेट्टी हे गुन्हेगार का ठरले?,' असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे. 

ख्रिस्ती समाजाविषयी केलेल्या विधानावरुन भाजपानं शेट्टींना माफी मागायला लावली, यामागे मतपेटीचं राजकारण आहे, अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं भाजपा नेतृत्त्वावर तोफ डागली. 'ख्रिश्चनांवरील वक्तव्यावरून भाजपच्या दिल्लीतील सर्वोच्च हायकमांडने गोपाळरावांना झापलं व माफी मागायला लावली. या दाबदबावामुळे भावनाविवश शेट्टी हे खासदारकीचा राजीनामा द्यायला निघाले. माझ्या ‘वाणी स्वातंत्र्यावर’ अशी गदा येत असेल तर नको ते पद, अशी भूमिका शेट्टी यांना घ्यावी लागली. यावरून त्यांचा किती मानसिक छळ झाला असेल याची कल्पना येईल. हिंदुत्ववादी ‘भाजप’ राजकारणासाठी ‘सेक्युलर’ होत आहे व सर्वच धर्माचे लोक त्यांना हवे आहेत. त्यामुळे अयोध्येत रामजी कायमचे वनवासात गेले तरी चालतील,' अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
 

Web Title: shiv sena slams bjp leadership over gopal shettys remarks on christian community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.