मुंबई: महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार स्थापन होऊन आता अडीच वर्षांचा काळ लोटला असला, तरी तीनही पक्षातील अंतर्गत धुसपूस सातत्याने समोर येत आहे. किंबहुना ती अधिकच वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. पाच राज्यातील दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षाने उदयपूर येथे चिंतन शिबिर आयोजित करून महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याच कालावधीत अनेक वर्षे काँग्रेसमध्ये असलेले सुनील जाखड आणि अलीकडेच पक्षात आलेले हार्दिक पटेल या दोघांनी राजीनामा दिला. यानंतर शिवसेनेने काँग्रेसवर प्रहार करत, काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी झाली असून, ठिगळं तरी कुठे कुठे लावायची, असा थेट सवाल केला आहे.
राहुल गांधींनी काँग्रेसच्या उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरात अनेक प्रश्न अधांतरी सोडले. त्याच कारणास्तव राज्या-राज्यांतील अनेक नेते काँग्रेस सोडताना दिसत आहेत. आगामी २०२४ ची तयारी पंतप्रधान मोदी आणि त्यांचा पक्ष वेगळ्या पद्धतीने करत असताना काँग्रेसमधील 'गळती' हंगाम सुरूच आहे. या पक्षाची अवस्था आभाळ फाटल्याप्रमाणे झाली आहे. संसदीय लोकशाहीसाठी हे चित्र बरे नाही. जाखड, हार्दिक यांच्यानंतरही ठिगळे वाढतच जाण्याची भीती आहे. ही भोके शिवणार कशी, अशी विचारणा शिवसेनेने केली आहे. सामना अग्रलेखातून काँग्रेसच्या सद्यस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे.
नव्याने गळतीचा आरंभ व्हावा हे चिंताजनक आहे
गेल्या काही काळापासून 'गळती' हा प्रकार काँग्रेसला नवीन राहिलेला नाही. पण सोनिया गांधींपासून राहुल गांधींपर्यंत सगळ्यांनीच काँग्रेस पुन्हा उभी करण्यासाठी 'हाक' दिली असतानाच नव्याने गळतीचा आरंभ व्हावा हे चिंताजनक आहे. पंजाबचे सुनील जाखड व हार्दिक पटेल बाहेर का पडले यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. बलराम जाखड हे काँग्रेस पक्षाचे एकेकाळचे दिग्गज नेते, गांधी परिवाराचे अत्यंत विश्वासू. बलराम लोकसभा अध्यक्षही झाले. सुनील जाखड हे त्याच बलरामांचे चिरंजीव. पंजाब काँग्रेसचे त्यांनी अनेक वर्षे नेतृत्व केले, पण नवज्योत सिद्धूला फाजील महत्त्व मिळाल्याने जाखड बाजूला फेकले गेले, असा आरोप शिवसेनेने सामना अग्रलेखातून केला आहे. त्याच जाखड यांनी शेवटी भारतीय जनता पक्षाची वाट धरली. जाखड यांनी पक्ष सोडताना काँग्रेस नेतृत्वाला काही सवाल केले, असेही म्हटले आहे.
काँग्रेस पक्ष त्या तुलनेत छोटा ठरल्याने तिघांनीही काँग्रेसचा त्याग केला
काँग्रेसने भरभरून दिले. त्यांच्या मुलांचेही कल्याण करण्यात काँग्रेसने कधी हात आखडता घेतला नाही. काँग्रेस पक्ष त्या तुलनेत छोटा ठरल्याने तिघांनीही काँग्रेसचा त्याग केला. संकटकाळात या तिघांची गरज असताना त्यांनी काँग्रेस सोडली. हे नेतृत्वाचेही अपयश म्हणावे लागेल. तरुणांना काँग्रेस पक्षात आपले भविष्य दिसत नसेल तर कसे व्हायचे? घराणेशाहीलाही विरोध झाला, पण जाखड यांच्या पाठोपाठ गुजरातच्या हार्दिक पटेलनेही काँग्रेस सोडली. एका नवज्योत सिद्धूसाठी काँग्रेसने पंजाब राज्य हातचे गमावले. तो सिद्धूही आता जेलमध्ये गेला आणि सिद्धूला अवास्तव महत्त्व मिळाले म्हणून जुनेजाणते जाखडही गेले. हार्दिक पटेल हा तरुण नेता काँग्रेसमध्ये आला तेव्हा गुजरात काँग्रेसला बहार येईल असे वाटले होते, पण हार्दिकला राज्याचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कामच करू दिले जात नव्हते, अशी टीका करण्यात आली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे नेतृत्व हमखास देशाबाहेर असते, असे हार्दिक पटेल म्हणतो. काँग्रेस हा जातीयवादी पक्ष असल्याचा साक्षात्कार हार्दिकला झाला. दुसरे म्हणजे, ऊठसूट अंबानी-अदानी यांना शिव्या घालून काहीच साध्य होणार नाही. गुजरातमधील प्रत्येक तरुणाला वाटते, आपणही अदानी-अंबानी व्हावे. अदानी-अंबानी त्यांचा आदर्श आहेत. त्यांच्या आदर्शावरच हल्ले करून गुजरात विधानसभा निवडणूक कशी लढणार? असा कडवा सवाल हार्दिक पटेलने केला आहे. काँग्रेस दिशाहीन पक्ष आहे. काँग्रेसकडे दूरदृष्टीचा अभाव आहे, असे हार्दिक पटेल याचे म्हणणे आहे. सोनिया गांधी यांचे वय आणि प्रकृती याबाबत अनेकांना चिंता वाटते. अर्थात, काँग्रेसचे नेतृत्व त्या तरीही करतात व त्यांचाच शब्द प्रमाण मानला जातो, असेही यात म्हटले आहे.