CoronaVirus: कोरोना रुग्णांकडून लाखो रुपये वसूल करणाऱ्या बोरिवलीच्या चार रुग्णालयांना शिवसेनेचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 07:51 PM2020-07-27T19:51:00+5:302020-07-27T19:51:47+5:30
आता मुंबई महानगर पालिकेने आता कोविड रुग्णावर ईलाज करण्यास मनाई केली आहे.
मनोहर कुंभेजकर
मुंबई : खासगी रुग्णालयांतील 80 टक्के जागा कोविड रुग्णांसाठी राखीव असून, सरकारी दराने उपचार करणे बंधनकारक आहे. परंतु बोरिवली पश्चिममधील चंदावरकर लेन व बाभई नाका येथाल अँपेक्स रुग्णालय, नाटकवाला लेन येथील धनश्री रुग्णालय व गोराई येथील मंगलमूर्ती रुग्णालय या चार रुग्णालयांना कोविड रुग्णांकडून लाखो रुपये वसूल केल्याचे प्रकार घडत होते. आता मुंबई महानगर पालिकेने आता कोविड रुग्णावर ईलाज करण्यास मनाई केली आहे.
ह्या संदर्भात शिवसेना विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस व आमदार प्रकाश सुर्वे यांनी महापालिका उपायुक्त विश्वास शंकरवार व आर मध्य वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त डॉ.भाग्यश्री कापसे यांची भेट घेऊन सदर रुग्णालयाच्या नफेखोरीबाबत तक्रार केली होती. रुग्णालयांवर कारवाई करावी अन्यथा शिवसेना जोरदार आंदोलन करेल असा इशारा दिला होता. तसेच रुग्णालयावर देखरेख करण्यासाठी नेमलेले सनदी अधिकारी प्रशांत नारनवरे यांच्याकडे देखिल लेखी तक्रार केली होती.
अँपेक्स रुग्णालयाकडून रुग्णांची लूटमार होत असल्याबाबत अनेक रुग्णांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्याबरोबरच एकाच रुग्णालयाचे दोन नोंदणी क्रमांक तसेच दोन पॅन कार्ड व दोन बीले देणे असे गैरव्यवहारही आढळून आले होते. बोरिवली पश्चिम येथील धनश्री रुंग्णांलयाकडूनही याच प्रकारे रुग्णांना लुबाडण्याचा प्रकार निदर्शनास आला होता. एका मयत रुग्णाचे ७ लाखाचे बील भरण्यासाठी नातेवाईकांवर दबाव आणल्यानंतर स्थानिक शिवसैनिकांनी ईंगा दाखविल्यानंतर रुग्णालयाने बिलात सवलत दिल्यानंतर मृतदेह ताब्यात दिला होता अशी माहिती आमदार पोतनीस यांनी लोकमतला दिली.
त्यानंतर मुंबई महानगर पालिकेने या रुग्णालयांवर कारवाई करुन बोरिवलीमधील चंदावरकर मार्ग व बाभई येथील अँपेक्स , नाटकवाला लेन येथील धनश्री व गोराई येथील मंगलमूर्ती ह्या रुग्णालयांना कोविडचे रुग्ण दाखल न करुन घेण्याची कारवाई केली आहे. शिवसेनेच्या दणक्याने बोरिवली परिसरातील खासगी रुग्णालयांच्या व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, आर मध्य वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी या चार रुग्णालयांवर पालिकेने कारवाई केली असल्याचे सांगितले. आमच्याकडे या रुग्णालयांबद्दल अनेक तक्रारी आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.