...तर गिरीश महाजन यांना जेएनयूमध्ये पाठवा- शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 08:06 AM2019-01-16T08:06:42+5:302019-01-16T08:09:30+5:30

कन्हैया कुमारवरील आरोपपत्रांवर भाष्य करत शिवसेनेचं भाजपावर शरसंधान

shiv sena slams kanhaiya kumar and bjp over jnu and evm | ...तर गिरीश महाजन यांना जेएनयूमध्ये पाठवा- शिवसेना

...तर गिरीश महाजन यांना जेएनयूमध्ये पाठवा- शिवसेना

googlenewsNext

मुंबई: भाजपाचे देशभरातील निवडणुकांमधील विजय आणि ईव्हीएम यावरुन शिवसेनेनं मित्रपक्षाला लक्ष्य केलं आहे. जेएनयूमध्ये कायम भाजपाचा दारुण पराभव होतो. महाराष्ट्राचे एक मंत्री गिरीश महाजन यांनी एका मुलाखतीत मला कुठेही पाठवा. भाजपाला विजयी करेन, असा दावा करत होते. त्यांना जेएनयूमध्ये पाठवा, असा टोला 'सामना'मधून लगावण्यात आला आहे. महाजन यांना जेएनयूमध्ये पाठवा. मात्र तिथली निवडणूक ईव्हीएमवर होत नाही, हे त्यांना जरुर सांगा, असा चिमटादेखील शिवसेनेनं काढला. 

जेएनयूमधील देशविरोधी घोषणा, त्यावरुन डाव्यांचा नेता कन्हैया कुमारविरोधात दाखल झालेलं आरोपपत्र, जेएनयूमध्ये भाजपाचा होणारा पराभव, ईव्हीएम अशा अनेक मुद्द्यांवर शिवसेनेनं भाष्य केलं. 'कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा आरोप ठेवल्यामुळे काही चळवळे वळवळू लागले आहेत. हे सर्व प्रकरण दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आहे. फेबुवारी 2016 मध्ये या विद्यापीठाच्या प्रांगणात संसदेवरील हल्लाप्रकरणी अफझल गुरूला फाशी दिल्याच्या विरोधात निषेध सभा घेण्यात आली होती. त्यात अफझल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्या. तो दिवस गुरूचा स्मृतिदिवस म्हणून पाळला गेला. हे सर्व देशद्रोही कृत्य असल्यानं कन्हैया कुमार, उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य व इतर 10 जणांवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. या सगळ्यांना नंतर अटक झाली व आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे असल्याचं पोलीस सांगतात. जर हे पुरावे पक्के असतील तर कन्हैया कुमारच्या बाजूने उभ्या राहिलेल्या प्रत्येकाचंच थोबाड फुटलं पाहिजे', अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं कन्हैया कुमार आणि त्याच्या समर्थकांचा समाचार घेतला.

देशभर निवडणुका जिंकणाऱ्या भाजपाचा जेएनयूमध्ये पराभव होतो, यावरही शिवसेनेनं भाष्य केलं. 'जवाहरलाल नेहरू विद्यापीठात माओवादी, नक्षलवादी, कश्मीर आझादीवाल्यांचा अड्डा आहे. मोदी व त्यांच्या भाजपनं देश जिंकला असला तरी त्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठावर झेंडा फडकवता आला नाही. तेथील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा नेहमीच दारुण पराभव होतो. देशविरोधी घोषणा देणारे मूठभर चळवळे त्यांना आवरत नाहीत व पराभूत करता येत नाहीत. याचा अर्थ या विद्यापीठात शैक्षणिक वातावरण उरलं नसून देशद्रोही चळवळ्यांनी येथे वाळवी लावली आहे काय? त्यांचा नेता कन्हैया कुमार हा अचानक देशातील युवकांचा नेता बनतो, हे कसं? जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील मतदान ‘ईव्हीएम’द्वारे होत नसल्यानं तेथील विजय मिळवणं अवघड झालं आहे काय? महाराष्ट्राचे एक मंत्री गिरीश महाजन यांनी कालच एका मुलाखतीत जाहीर केले, ‘मला कुठेही पाठवा, मी जादू दाखवीन. भाजपला विजयी करून दाखवीन.’ आमचं भाजपला आवाहन आहे, गिरीश महाजन यांच्यासारख्या कर्तबगार भाजप मंत्र्याला ‘जेएनयू’मध्ये मुक्कामाला पाठवा व देशद्रोह्यांचा पराभव घडवा. फक्त त्यांना इतकेच सांगा, ‘जेएनयू’मधील निवडणूक ईव्हीएमवर होत नाही,' असा टोला शिवसेनेनं लगावला.
 

Web Title: shiv sena slams kanhaiya kumar and bjp over jnu and evm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.