Maharashtra Politics: “मुंबईचे महत्त्व कमी केले, महाराष्ट्रातून दोन लाखांचे प्रकल्प पळवले, तरी पंतप्रधानांचे स्वागत असो!”

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 08:37 AM2023-01-19T08:37:28+5:302023-01-19T08:40:52+5:30

Maharashtra News: काम शिवसेनेचे, मेहनत मुंबई महापालिकेची व प्रचाराच्या चिपळ्या भाजप वाजवणार, या शब्दांत शिवसेनेने पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरुन टीका केली आहे.

shiv sena slams pm narendra modi visit mumbai in saamana editorial | Maharashtra Politics: “मुंबईचे महत्त्व कमी केले, महाराष्ट्रातून दोन लाखांचे प्रकल्प पळवले, तरी पंतप्रधानांचे स्वागत असो!”

Maharashtra Politics: “मुंबईचे महत्त्व कमी केले, महाराष्ट्रातून दोन लाखांचे प्रकल्प पळवले, तरी पंतप्रधानांचे स्वागत असो!”

googlenewsNext

Maharashtra Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी काही तासांच्या मुंबई भेटीवर येत आहेत व या काही तासांत ते मुंबईच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करतील असे सांगण्यात आले. सरकारतर्फे तशा प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. पंतप्रधानांचे ठीक आहे, पण मुंबईच्या भविष्याची व भाग्योदयाची चिंता भाजपास केव्हापासून वाटू लागली हा प्रश्नच आहे, असा खोचक टोला लगावत मुंबईचे आर्थिक, औद्योगिक महत्त्व कमी करून हा कायापालट केंद्राने सुरूच केला आहे. महाराष्ट्रातून सवादोन लाख कोटींचे प्रकल्प पळवून नेले. तरीही आमच्या पंतप्रधानांचे स्वागत असो! आहेच!!, या शब्दांत शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर निशाणा साधला. 

काम शिवसेनेचे, मेहनत मुंबई महापालिकेची व प्रचाराच्या चिपळय़ा भाजप वाजवणार. पंतप्रधान येतील व मुंबईचा कायापालट करतील असे जाहीर केले. यालाच मुंबई-महाराष्ट्राचा भाग्योदय असे म्हणायचे आहे काय? पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी गर्दी करण्याचे नियोजन आहे व येणाऱ्यांच्या गाडय़ा-घोडय़ांच्या पार्किंगची सोय व्हावी म्हणून कलिना येथील मुंबई विद्यापीठाची संरक्षक भिंतच तोडण्यात आली. मुंबईच्या भाग्योदयाची सुरुवात विद्यापीठाची भिंत तोडून झाली. मुंबईतील एका एका प्रमुख वास्तूंवर असे हातोडे घातले जात आहेत, अशी टीका शिवसेनेने सामना अग्रलेखातून केली आहे. 

मुंबईवरील शिवसेनेचा भगवा उतरवता येईल काय? 

पंतप्रधान मुंबईच्या उज्ज्वल भविष्यासाठी अवतरत आहेत हा प्रचार खोटा आहे. ते त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी व मुंबईवरील शिवसेनेचा भगवा उतरवता येईल काय? या भविष्यातील विचाराने येत आहेत. नव्हे, पंतप्रधानांना त्याच हेतूने मुंबईस बोलावले आहे, असा दावा करत, या दौऱ्याच्या निमित्ताने मुंबईत लावलेल्या कटआऊट्समध्ये बाळासाहेबांपेक्षा भाजप नेत्यांचे कटआऊट्स मोठे दिसत आहेत. स्वतःला बाळासाहेबांची शिवसेना म्हणवून घेणारे मिंधे यावरही मूग गिळून का बसले आहेत? असा सवाल शिवसेनेने केला आहे. 

तोपर्यंत हे सरकार टिकेल काय?

मुख्यमंत्री शिंदे हे जागतिक गुंतवणूकदारांच्या मेळाव्यासाठी परदेशात होते. तेसुद्धा दौरा आटोपता घेऊन मुंबईस परत आले. मुंबई विमानतळावर त्यांचे म्हणे त्यांच्या गटाने जल्लोषात स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी येताना खिशात एक लाख कोटींचे उद्योग करार आणले. ते करार जमिनीवर उतरल्यावरच स्वागत व्हावे. अर्थात तोपर्यंत हे सरकार टिकेल काय? अशी खोचक विचारणा शिवसेनेने केली आहे. 

दरम्यान, शिवसेनेने केलेल्या नागरी कामांचेच उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मुंबईत येत आहेत. भारतीय जनता पक्षाने या कामाचे श्रेय भलेही घेण्याचा प्रयत्न केला तरी जनतेला सर्व काही माहीत आहे. प्रश्न श्रेयवादाचा नसून लोकांची दिशाभूल करण्याचा जो प्रकार सुरू झाला आहे त्यावर परखड भूमिका घेण्याचा आहे, या शब्दांत शिवसेनेने हल्लाबोल केला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shiv sena slams pm narendra modi visit mumbai in saamana editorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.