मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक मातब्बर नेते भाजपामध्ये आले आहेत. ज्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली तेच राजकारण त्यांच्या अंगलट आलं आहे. शरद पवारांचे राजकारण आता संपुष्टात आले आहे. शरद पवारांनी तोडण्या-फोडण्याचं राजकारण केले त्यामुळे आता त्यांना हे भोगावे लागत आहे, असे म्हणत पवारांचं पर्व संपलं असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. फडणवीसांच्या पर्व या शब्दावरुन शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. तसेच, अमित शहांच्या भाषणावरही शिवसेनेनं टीपण्णी केली आहे. नवीन पिढीचं राजकारण वेगळं आहे. मी शरद पवार नाही, मी देवेंद्र फडणवीस आहे आता आमचं राजकारण सुरु झालंय अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या टोल्यावरुन शिवसेनेच्या सामना वर्तमानपत्रातील अग्रलेखात फडणवीसांना सूचना करण्यात आली आहे. पर्व कधीतरी संपतच असते, असे म्हणत सामनातून मुख्यमंत्र्यांना बारीक चिमटा घेण्यात आला आहे.
काँग्रेस अतिदक्षता विभागात आहे तर राष्ट्रवादी लटपटत्या पायांवर उभी आहे. शरद पवार हे महाराष्ट्र पालथा घालत आहेत, पण उपयोग काय? त्यांची तडफ वाखाणण्याजोगी आहे इतकेच. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, शरद पवारांचे पर्व संपले आहे. इथे पर्व हा शब्द त्यांनी वापरला आहे. जो काही घडवतो, निर्माण करतो त्याचेच पर्व असते व पर्व हे कधीतरी संपत असतेच. बाकी सर्व माजी ठरतात. मुख्यमंत्र्यांनी असाही आरोप केला की, पवारांनी तोडाफोडीचे राजकारण केले, त्याची फळे ते भोगत आहेत. निवडणुका लढवण्यासाठी माणसे तोडून फोडून घ्यावी लागतात, हा आजवरचा इतिहास आहे, असेही सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.
दरम्यान, एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पवारांवर टीका करताना, पवारांचे पर्व संपल्याचं म्हटलं होतं. गेल्या 4 वर्षात कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप युतीच्या सरकारवर झाले नाहीत. विरोधकांनी भाषणात घोटाळ्याचे आरोप केले, विरोधकांनी एकाही आरोपाचे पुरावे दिले नाहीत. हवेत आरोप करतात, पुरावे द्यावेत, 15 वर्ष आम्ही विरोधात होतो एकही आरोप पुराव्याशिवाय लावला नाही. हायकोर्टातही आरोप सिद्ध झाले नाही असा दावा त्यांनी केला होता.