आगामी पालिका निवडणुकीत मुंबईवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना जोमाने लागली कामाला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 10:44 AM2020-11-24T10:44:17+5:302020-11-24T10:55:49+5:30
उद्धव ठाकरे हे पालिका निवडणुकीची रूपरेषा ठरवण्यासाठी विभागप्रमुख व शिवसेनेच्या आमदारांशी थेट संपर्क साधत आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई: 1996 साली मिलींद वैद्य हे मुंबईचे महापौर झाले.1996 ते आजमितीस मुंबई महानगर पालिकेवर शिवसेनेचा भगवा डोमने फडकत असून शिवसेनेचा महापौर विराजमान आहे. 2022 साली होणाऱ्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा व मनसे कामाला लागली असतांना शिवसेना सुद्धा जोमाने कामाला लागली आहे.
एकीकडे कोरोनाचा मुकाबला करतांना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यश आले आहे. तर दुसरीकडे 2022 च्या मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हा, "सेना भी तयार और सेनापती भी" अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. उद्धव ठाकरे हे पालिका निवडणुकीची रूपरेषा ठरवण्यासाठी विभागप्रमुख व शिवसेनेच्या आमदारांशी थेट संपर्क साधत आहे. तर राज्याचे पर्यावरण मंत्री व उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे हे स्वतः नगरसेवकांशी संवाद साधत आहे.
आज सायंकाळी 6 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंधेरी (पश्चिम),अंधेरी (पूर्व) वर्सोवा या तीन विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्याचे परिवहन मंत्री, संसदीय कार्यमंत्री व विभागप्रमुख अँड.अनिल परब यांच्या यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत या तीन विधानसभा मतदार संघातील विधानसभा संघटक, विधानसभा समन्वयक, नगरसेवक, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख पुरुष व महिला असे एकूण 79 पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहेत. गेल्या शनिवार पासून स्वतः मुख्यमंत्री हे मुंबई शहर व उपनगरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत.
विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस यांच्या उपस्थितीत ठाकरे यांनी विभाग क्रमांक 1च्या शिवसेना नगरसेवकांशी नुकताच सह्याद्री अतिथीगृहात संवाद साधला होता आणि त्यांच्या सरकार दरबारी असलेल्या विभागातील समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते.तर राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिवाळी पूर्वी बोरिवलीच्या साई कृपा हॉल मध्ये झालेल्या विभागक्रमांक 1 च्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात पुन्हा पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले होते.
शिवसेना ही कामाचा बोभाटा कधी करत नाही. मात्र गनिमी काव्याने शिवसेनेचे काम शिवसेनेच्या मुंबईतील 227 शाखांमधून जोमाने सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या गनिमी काव्याने 2022च्या पालिका निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेचाच महापौर विराजमान असेल असा ठाम विश्वास शिवसेनेचे प्रवक्ते,आमदार व माजी महापौर सुनील प्रभू यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचा चेहरा मोहरा बदलतो आहे.मुबंई करांना मुबलक पाणी मिळण्यासाठी मध्य वैतरणा प्रकल्प मुंबईकरांना वरदान ठरतो आहे.तर कोस्टल रोड प्रकल्प,मेट्रो प्रकल्प यांचे काम जोमाने सुरू आहे.पर्यावरणाचा विचार करून आरेत होणारे मेट्रो कार शेड प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी रद्द करून दाखवला.बेस्टच्या मिनी वातानुकुलीत बसेसला तर मुंबईकरांनी जोरदार पसंती दिली असून मुंबईच्या ताफ्यात आता आधुनिक डबलडेकर बसेस येणार आहे असा शिवसेनेच्या कामाचा लेखाजोखा आमदार प्रभू यांनी मांडला.कोणी किती जरी देव पाण्यात ठेवले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचे सरकार आपला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण ही शिकवण शिवसैनिकांना दिली. आज शिवसेनेच्या 227 शाखा या कान व डोळे आहेत. 12 पुरुष व महिला विभागप्रमुख,विधानसभा संघटक, विधानसभा समन्वयक, उपविभागप्रमुख, 227 शाखाप्रमुख व सुमारे 10000 गटप्रमुख असा मोठा शिवसैनिकांचा ताफा शिवसेनेकडे आहे. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची युवासेना सुद्धा जोमाने काम करत अनेक लोकपयोगी उपक्रम राबवत आहे. शिवसेना नेते व खासदार गजानन कीर्तिकर यांच्या लोकाधिकार समितीचे कार्य देखिल जोमाने सुरू आहे.भारतीय कामगार सेनेच्या अधिपत्याखाली मोठा कामगार वर्ग आहे.त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना सज्ज झाल्याचे चित्र आहे.