लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : १९९६मध्ये मिलिंद वैद्य हे मुंबईचे महापौर झाले. १९९६ ते आजमितीस मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकत असून शिवसेनेचा महापौर विराजमान आहे. २०२२मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व मनसे कामाला लागली असताना शिवसेनासुद्धा जोमाने कामाला लागली आहे.
एकीकडे कोरोनाचा मुकाबला करताना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यश आले आहे. तर दुसरीकडे २०२२च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हा, ‘सेना भी तयार और सेनापती भी’ अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.
बुधवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील जोगेश्वरी (पूर्व), अंधेरी (पश्चिम), अंधेरी (पूर्व) वर्सोवा, गोरेगाव, दिंडोशी या सहा विधानसभा मतदारसंघांतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे, राज्याचे परिवहन मंत्री, संसदीय कार्यमंत्री व विभागप्रमुख ॲड. अनिल परब, शिवसेनेचे प्रवक्ते, आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभू, माजी राज्यमंत्री व आमदार रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत या सहा विधानसभा मतदारसंघातील विधानसभा संघटक, विधानसभा समन्वयक, नगरसेवक, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख पुरुष व महिला असे प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहेत. गेल्या शनिवारपासून स्वतः मुख्यमंत्री हे मुंबई शहर व उपनगरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत.
शिवसेना ही कामाचा बोभाटा कधी करत नाही. मात्र गनिमी काव्याने शिवसेनेचे काम शिवसेनेच्या मुंबईतील २२७ शाखांमधून जोमाने सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या गनिमी काव्याने २०२२च्या पालिका निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेचाच महापौर विराजमान असेल, असा ठाम विश्वास शिवसेनेचे प्रवक्ते सुनील प्रभू यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
---------------------------------------