Join us

“गोवंडीतील एका गार्डनला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यास शिवसेनेचं समर्थन; मतांसाठी किती लाचारी करणार?”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 7:59 PM

महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी अजून किती झुकणार? शिवसेनेला याचं उत्तर द्यावंच लागेल असं कोटक यांनी म्हटलं आहे.

मुंबई – आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेना एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण करत आहेत. काही दिवसांपूर्वी घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपूलाला छत्रपती शिवाजी महाराज नाव द्यावं या मागणीसाठी खासदार मनोज कोटक यांनी स्थापत्य समितीकडे पत्र पाठवलं होतं. परंतु त्यानंतर शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी या पुलाला मोहिनुद्दीन सुफी चिश्ती अजमेरी नाव द्यावं म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं होतं.

यानंतर आता गोवंडीतील एका गार्डनला टीपू सुलतान नाव देण्यासाठी शिवसेनेने समर्थन केलं असल्याचा दावा खासदार मनोज कोटक यांनी करत म्हटलंय की, मतांसाठी अजून किती लाचारी करणार आहात? महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी अजून किती झुकणार? शिवसेनेला याचं उत्तर द्यावंच लागेल असं कोटक यांनी म्हटलं आहे.

घाटकोपर मानखुर्द उड्डाणपूल नामकरणावरून वाद

घाटकोपर मानखुर्द उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असे नाव देण्याची मागणी केलेली असतानाही केवळ मतांच्या राजकारणासाठी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी वेगळ्या नावाचा अट्टहास कशासाठी चालविला आहे, असा प्रश्न भाजप खासदार मनोज कोटक यांनी केला होता. विशेष, म्हणजे आपला मतदारसंघ सोडून शेजारच्या विकासकामाबाबत शेवाळे यांनी केलेली मागणी औचित्याला धरून नसल्याचेही कोटक म्हणाले होते.

दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथील नवीन उड्डाणपुलाला सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यासाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले. छेडानगर ते मानखुर्द या परिसरात सुमारे ७० टक्के लोकसंख्या ही मुस्लिम असल्यामुळे या उड्डाणपुलास सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव देऊन मुस्लिम समाजाच्या भावनांचा सन्मान करावा अशी मागणी शेवाळे यांनी पत्रात केली होती. या पत्रावरून शिवसेना-भाजपात गदारोळ झाला होता.  

टॅग्स :भाजपाशिवसेना