BREAKING Shiv Sena Symbol: ठाकरे गटाला 'मशाल' चिन्ह मिळालं, शिंदे गटाला नव्यानं चिन्हं सुचवण्याचे आदेश!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 08:00 PM2022-10-10T20:00:30+5:302022-10-10T20:05:41+5:30
निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्यात आलं होतं.
मुंबई-
निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्यात आलं होतं. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हासाठी तीन पर्याय देण्यास सांगण्यात आलं होते. दोन्ही गटाकडून त्यादृष्टीनं प्रत्येकी तीन पर्याय सुचविण्यात आले होते. आता निवडणूक आयोगानं आपला निकाल जाहीर केला आहे. यात ठाकरे गटाला 'मशाल' चिन्ह देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाला नव्याने तीन चिन्हाचे पर्याय देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्यातरी शिंदे गटाला निवडणूक आयोगानं कोणतंही चिन्ह दिलेलं नाही.
शिंदे गट 'बाळासाहेबांची शिवसेना' तर ठाकरे गटाला मिळालं 'हे' नाव! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
गेल्या आठवड्याभरापासून शिवसेनेच्या निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणासाठीची लढाई ठाकरे आणि शिंदे गटात सुरू होती. निवडणूक आयोगानं यावर मोठा निर्णय घेत शिवसेना पक्षाच्या नावाच्या वापरास बंदीचा आणि धनुष्यबाण निशाणी गोठविण्याचा अंतरिम आदेश जाहीर केला. त्यानंतर दोन्ही गटांना पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी प्रत्येकी तीन पर्याय देण्यास सांगण्यात आलं होतं.
ठाकरे गटाकडून निवडणूक चिन्हासाठी धगधगती मशाल, उगवता सूर्य आणि त्रिशूळ हे तीन पर्याय देण्यात आले होते. पण त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह असल्यानं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार हे चिन्ह देता येणार नाही, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. तर उगवता सूर्य हे निवडणूक चिन्ह याआधीच डीएमके पक्षाचं आहे. त्यामुळे हेही चिन्ह फेटाळून लावण्यात आलं. तर ठाकरे गटानं सुचवलेला तिसरा पर्याय म्हणजेच मशाल चिन्हाला निवडणूक आयोगानं परवानगी दिली आहे.
दुसरीकडे शिंदे गटानंही ठाकरे गटावर कुरघोडी करत त्रिशुळ, उगवता सूर्य आणि गदा हे तीन पर्याय सूचविण्यात आले होते. शिंदे गटाचे हे तिनही पर्याय निवडणूक आयोगानं फेटाळून लावले आहेत. शिंदे गटाला पुन्हा एकदा निवडणूक चिन्हाचे पर्याय सादर करण्याची संधी दिली आहे.
ठाकरे आणि शिंदे गटाला नावही मिळालं
ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव देण्यास निवडणूक आयोगानं परवानगी दिली आहे. तर शिंदे गटाला निवडणूक आयोगानं 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव वापरण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. दोन्ही पक्षाकडून पक्षाच्या नावासाठी प्रत्येकी तीन पर्याय देण्यात आले होते.