Shiv Sena symbol, Chhagan Bhujbal: ...तेव्हा छगन भुजबळ होते शिवसेनेचे उमेदवार, चिन्ह होतं मशाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 10:07 PM2022-10-10T22:07:45+5:302022-10-10T22:08:15+5:30
नक्की केव्हा घडलेला हा प्रकार, कोणता होता तो मतदार संघ... जाणून घ्या
Shiv Sena symbol, Chhagan Bhujbal: शिवसेनेत अभूतपूर्व असे बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी बंडखोरी झाल्यापासून आम्हीच खरी शिवसेना असा दावा केला आहे. या दाव्यावर आता निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय घ्यायचा आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अंधेरीची पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना नक्की कोणाची याचा निर्णय घेणे आवश्यक होते. पण निवडणूक आयोगाचा अद्याप निर्णय न झाल्याने, या निवडणुकीपुरते पक्षाचे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरते गोठवण्यात आले. आता ठाकरे गट 'शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)' या नावाने तर शिंदे गट 'बाळासाहेबांची शिवसेना' या नावाने निवडणूक लढवू शकणार आहे. त्यासोबतच ठाकरे गटाला नवे चिन्ह म्हणून 'धगधगती मशाल' देण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण आहे. या आधीही शिवसेनेने मशाल या चिन्हावर निवडणूक लढवलेली आहे. मात्र योगायोगाने त्यावेळी त्यांचे उमेदवार होते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले छगन भुजबळ! नक्की केव्हाची आहे ही घटना, कोणता होता तो मतदार संघ... जाणून घेऊया
छगन भुजबळ, शिवसेना अन् मशाल!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९७२ साली माझगांव विभागातून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी छगन भुजबळांना उभे केले. जनतेने त्या निवडणूकत त्यांनी निवडूनही दिले. १९७८ साली महापालिकेची दुसरी निवडणूक झाली. पहिल्या पांच वर्षाच्या माझ्या कामाची पोचपावती म्हणून, मतदारांनी पुन्हा एकदा भुजबळांना निवडून दिले. अनेक रथी-महारथी विरोधकांच्या अनामत रकमा जप्त झाल्या, इतक्या मोठ्या प्रमाणात भुजबळांना यश मिळाले. माझगांवच्या या निवडणुकांमधील यशानंतर त्यांना १९८५ साली विधानसभेकरता माझगांव विभागातून आमदारकीचे तिकीट देण्यात आले. त्यांच्यासाठी विधासभा लढवण्याची ही पहिलीच वेळ होती. १९८५ साली माझंगाव विधानसभा मतदार संघातून छगन भुजबळ हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते आणि तेव्हा त्यांचे चिन्ह होते मशाल. योगायोगाने आता हेच चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या गटालाही मिळाले आहे, पण छगन भुजबळ मात्र या पक्षात नाहीत.
छगन भुजबळ यांनी आपल्या आमदारकीच्या प्रचारासाठी एक पुस्तक तयार केले होते. त्यात त्यांनी अनेक गोष्टी नमूद केल्या होत्या. ते म्हणतात, "या कालखंडामध्ये आपल्या भागातील नागरिकांना विविध सुविधा देण्याचा मी यशस्वी प्रयत्न केला. माझ्या चाहत्यांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेत याची चित्रमय झलक आपण पहालच. महानगरपालिका सभागृहात विविध समस्यांवर मी आवाज उठविला. त्याच बरोबर महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात वेळोवेळी उद्भवलेल्या अनेक प्रश्नांचा ऊहापोह केला. मग तो रॉकेल टंचाई असो, की बेळगांव कारवार प्रश्न असो, किंवा गिरणी कामगारांचा प्रश्न असो, किंवा 'बॉम्बे "ऐवजी "मुंबई" हे नांव प्रचारात आणण्याचा प्रश्न असो. अशा विविध प्रश्नांना मी महापालिकेच्या माध्यमातून तसेच सार्वजनिक व्यासपिठावरून वाचा फोडली आहे. माझी ही भरीव कामगिरी पाहून बाळासाहेब ठाकरे यांनी मला महापालिका शिवसेना गटाचा नेता नेमले. मुंबई महानगरपालिकेनेही माझ्या कार्याचा गौरव म्हणून अनेक महत्वांच्या संस्थांवर माझी नियुक्ती केली, इतकेच नव्हे तर तीन वेळा मुंबई महानगरपालिकेचा प्रतिनिधी म्हणून मला परदेशी अभ्यास दौऱ्यावर पाठविले."
"बेळगांव-कारवार सीमा प्रश्न, बस भाडे वाढ, दूधभाव वाढ अशा अनेक जन आंदोलनात अग्रभागी राहून मी प्रसंगी कारावासाची शिक्षा भोगली. अशा प्रकारे केवळ नागरी सुख-सोयीं वाबतच नव्हे तर, समाजातील अन्य विविध कार्यामध्ये मी सक्रीय भाग घेतला. म्हणूनच शिवसेनेने माझगांव विभागातून विधान सभेकरिता माझी उमेदवारी जाहीर केली," असे मनोगत भुजबळांनी त्या पुस्तकात मांडले आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही गटांना आता अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी १० तारखेपर्यंत उमेदवाराची घोषणा करावी लागणार आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट कोणाला उमेदवारी देणार याबाबत मोठं प्रश्नचिन्ह आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार असून ६ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निवडणुकीसाठी अद्याप तरी कोणीच आपला उमेदवार जाहीर केलेला नाही, पण शिवसेनेकडून रमेश लटके यांच्या पत्नीला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर भाजपाकडून मुरजी पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी ठाकरे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.