स्वत:ला काय समजता? जमत नसेल तर राज्य शासनात परत जा; आयुक्तांविरोधात शिवसेना आक्रमक
By कुणाल गवाणकर | Published: October 14, 2020 12:28 PM2020-10-14T12:28:03+5:302020-10-14T12:28:56+5:30
मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याविरोधात शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
मुंबई: मंदिरं खुली करण्यावरून मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात काल संघर्ष पेटला. यानंतर आज मुंबई महापालिकेत शिवसेना विरुद्ध आयुक्त यांच्यात 'सामना' सुरू झाला आहे. आयुक्त इक्बालसिंह चहल उद्धटपणे उत्तरं देत असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे. आयुक्तांनी महापौर, सभागृह नेत्या, नगरसेवकांचा मान राखावा, अन्यथा राज्य शासनात परत जावं, असा पवित्रा शिवसेनेनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आयुक्तांची तक्रार करणार असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
आज प्रभाग समित्यांची निवडणूक असल्यानं महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि शिवसेनेचे नगरसेवक सकाळी सभागृहात पोहोचले. मात्र पालिकेतील अधिकारी अनुपस्थित होते. त्यामुळे महापौरांसह शिवसेना नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली. 'आम्ही सकाळी वेळेत निवडणुकीसाठी पोहोचलो होतो. मात्र अधिकारी गैरहजर होते. डीएमसी, वॉर्ड ऑफिसरना वारंवार फोन केले. मात्र त्यांनी फोन उचलण्याचीही तसदी घेतली नाही,' असं पेडणेकर म्हणाल्या.
'आयुक्तांना अनेकदा फोन केले. बऱ्याचदा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी एकदा प्रतिसाद दिला. त्यावेळी ते अतिशय उद्धटपणे बोलले. तुम्ही पॅनिक का होताय? तुम्हाला थोडा वेळ थांबता येत नाही का? अशा भाषेत ते फोनवर बोलले. आयुक्त कामात असू शकतात. त्यांचीही काही कारणं असू शकतात. पण त्यांनी ती कळवायला हवीत. किमान त्यांनी खुर्चीचा मान राखायला हवा. ते स्वत:ला काय समजतात? त्यांना काम जमत नसेल, तर त्यांनी राज्य शासनात परत जावं,' अशा शब्दांत महापौरांनी त्यांची नाराजी व्यक्त केली.
आयुक्त चहल यांच्याविरोधात सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनीदेखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. 'अनेकदा फोन करूनही आयुक्त फोन घेत नाहीत. फोन उचलल्यावर मी कोविड रुग्णालयांना भेटी देतोय. तुम्हाला जरा संयम राखता येत नाही का, असं उद्धटपणे बोलतात. कोरोना परिस्थितीतला ताण आम्ही समजू शकतो. पण त्याचा राग फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीवर काढायचा नसतो. अडचणी आम्हालाही असतात. पण आम्ही फोनवर अदबीनं बोलतो,' असं राऊत म्हणाल्या.