...तर तो हिंदूंच्याच हातून मार खाईल; शिवसेनेचा भाजपावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 08:32 AM2020-03-02T08:32:58+5:302020-03-02T08:39:13+5:30
Shiv Sena: पाच वर्षे महाराष्ट्रात तुमचेच सरकार होते, केंद्रातही तुम्हीच आहात. मग पाच वर्षांत औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ का करू शकला नाहीत?
मुंबई - हिंदूंचा स्वाभिमान हा प्रखर राष्ट्रवादाशी जोडला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवाद कदापि मार खाणार नाही. जो राष्ट्रवाद मारण्याचा प्रयत्न करील तो हिंदूंच्याच हातून मार खाईल. कारण आम्ही सगळेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वंशज आहोत अशा शब्दात शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात भाजपचे घोडे हे अजूनही मोगलांप्रमाणे सरळ पाणी प्यायला तयार नाहीत. विरोधी पक्ष म्हणजे फक्त लाथा झाडायला आणि हवे तसे बेताल बोलायलाच उरला आहे काय? असा प्रश्न लोकांना पडत आहे. आम्हाला महाराष्ट्रात शांतता हवी आहे. दादामियांसारख्या लोकांनी औरंग्याची पिशाचे कितीही उकरून काढली तरी महाराष्ट्राची शांतता भंग पावणार नाही हे दादामियांनी पक्के लक्षात ठेवावे. असे अनेक दादामियां गोधडय़ा भिजवत होते तेव्हा शिवसेना हिंदुत्व आणि राष्ट्रकार्यासाठी छातीचा कोट करून लढत होती असा टोला भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांना दिला आहे.
सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
- भाजपचे दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले? त्यांना इतिहासाचे उत्खनन करण्याची इतकीच आवड असेल तर पंचवीस वर्षांपूर्वी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ केल्याचे त्यांच्या लक्षात यायला हवे होते.
- महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या वागण्या-बोलण्याला तसा काही अर्थ उरलेला नाही. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील वगैरे राज्यातील मंडळी सध्या जे बोलतात आणि करतात त्यात त्यांचे वैफल्यच दिसून येते. चंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे ‘दादामियां’ हेसुद्धा आता फडणवीसांच्या पावलावर पाऊल टाकून नको तिथे जीभ टाळय़ास लावीत आहेत.
- आता त्यांनी संभाजीनगरात जाऊन अशी आपटली आहे की, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. त्यामुळे ‘औरंगाबाद’चे नामकरण झालेच पाहिजे.’’ भाजपच्या दादामियांचा आवेश आणि जोर पाहता या मंडळींची फक्त जीभच सटकली आहे असे नाही, तर बरेच काही सटकले आहे हे नक्की.
- छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत. दादामियांनी हे स्वतःच जाहीर करण्याचे कारण नाही. महाराष्ट्रात कोणीही ‘औरंगजेबा’चे वंशज नाहीत. औरंगजेबाला महाराष्ट्राने कायमचे गाडले आहे. त्याबद्दल सगळय़ांनाच सार्थ अभिमान आहे.
- भारतीय जनता पक्ष व त्यांचे लोक गेल्या पाचेक वर्षांपासून छत्रपती शिवाजीराजांचे नाव घेत आहेत व आता तर ‘पंतप्रधान मोदी हेच शिवाजी महाराज’ अशी पुस्तके छापून वाटण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यामुळे आपण नक्की कोणाचे वंशज आहोत हे त्यांनी सांगायला हवे. ‘‘औरंगाबादचे नामकरण ‘संभाजीनगर’ झालेच पाहिजे’’ असे त्यांनी ओरडून सांगितले आहे.
- पाच वर्षे महाराष्ट्रात तुमचेच सरकार होते, केंद्रातही तुम्हीच आहात. मग पाच वर्षांत औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ का करू शकला नाहीत? तिकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्या झटक्यात वाराणसीचे प्रयागराज केले. इतरही नावे-गावे बदलली. त्यांना कोणीच अडवले नाही.
- फडणवीस यांना औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ करायला कोणाची परवानगी हवी होती? बाबर, अफझलखान, शाइस्तेखान, औरंगजेब हे सर्व मोगल सरदार आक्रमक होते असे व्याख्यान देण्याची गरज नाही
- औरंगजेबाचे पिशाच गाडून ‘‘औरंगाबाद नव्हे, आजपासून हे संभाजीनगर आहे,’’ असे ठणकावून सांगणारे शिवसेनाप्रमुखच होते. बाबरापासून औरंगजेबापर्यंत सगळी पिशाचे गाडून त्यांना मूठमाती देण्याचे कार्य शिवसेनेनेच पार पाडले आहे.
- औरंगाबादचा उल्लेख प्रत्येक स्वाभिमानी हिंदू ‘संभाजीनगर’ असा जो अभिमानाने करतो तो केवळ आणि केवळ शिवसेनाप्रमुखांमुळेच आणि तेच बाळकडू पचवून शिवसेना आपले मार्गक्रमण करीत आहे. आता एकेकाळचे ‘मित्रवर्य’ भाजपास जो हिंदुत्व आणि राष्ट्रवादाचा पुळका आला तो का आणि कशासाठी हे काय जनतेला समजत नाही?
- कधी वीर सावरकर तर कधी ‘संभाजीनगर’, कधी आणखी काही. हे विषय फक्त राजकारण तोंडी लावायलाच घेतलेत ना? ना मुंबईत छत्रपती शिवरायांच्या भव्य स्मारकाची एक वीट रचली, ना वीर सावरकरांना भारतरत्न दिले. तिकडे अयोध्येतही श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहत आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेने. त्यात आता पापी औरंग्याची भर पडली आहे इतकेच.