Join us

मोदींच्या '५६ इंची छाती'वर 'ठाकरे' सिनेमाच्या ट्रेलरमधून नेम; पाहा बाळासाहेबांचा भारी डायलॉग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 5:32 PM

बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडी असलेला डायलॉग ऐकताक्षणीच, तो खास मोदींना चपराक लगावण्यासाठीच सिनेमात घेतलाय की काय अशी शंका मनात येते.

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अगदी रोजच टीकेचे बाण सोडणाऱ्या, आधी अयोध्येतून आणि मग पंढरपुरातून त्यांना लक्ष्य करणाऱ्या शिवसेनेनं आता 'ठाकरे' या बहुचर्चित सिनेमामधूनही मोदींच्या '५६ इंची छाती'वर निशाणा साधल्याचं पाहायला मिळतंय. 

'माणसाची ताकद छाती किती इंचाची आहे त्यावर ठरवत नसतात, ताकद मेंदूत असते', असा एक डायलॉग या सिनेमामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या तोंडी आहे. हे वाक्य बाळासाहेबांच्या अलीकडच्या भाषणांमध्ये ऐकायला मिळालेलं नाही. त्यामुळे हा डायलॉग ऐकताक्षणीच, तो खास मोदींना चपराक लगावण्यासाठीच सिनेमात घेतलाय की काय अशी शंका मनात येते.  

जसजशा निवडणुका जवळ येऊ लागल्यात तसतशी शिवसेना अधिक आक्रमक होऊन भाजपावर हल्लाबोल करताना दिसतेय. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानं तर शिवसेनेला नवं बळच मिळालंय. त्यामुळे स्वबळाचा नारा आणखी बुलंद करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वेगवेगळ्या सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवताहेत. 'चौकीदारच चोर' झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. त्यांच्याच सुरात उद्धव यांनी सूर मिसळल्यानं राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. हे भाजपावरील दबावतंत्र आहे की निवडणुकीच्या रणसंग्रामातही हे जुने मित्र आमनेसामने उभे ठाकणार, याबद्दल चर्चा रंगलीय. 

या पार्श्वभूमीवरच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' या सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. २५ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. शिवसेनेच्या प्रचाराच्या रणनीतीचा भाग म्हणूनही याकडे पाहिलं जातंय. अशी चर्चा असतानाच, या सिनेमातील एका डायलॉगने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. 'मातोश्री'च्या गच्चीवर बाळासाहेब उभे आहेत आणि त्यांच्याच आवाजात एक डायलॉग ऐकू येतो, 'माणसाची ताकद छाती किती इंचाची आहे त्यावर ठरवत नसतात, ताकद मेंदूत असते.' आता या एका वाक्यात किती ताकद आहे हे सूज्ञांना वेगळं सांगायची गरज नाही, नाही का?

टॅग्स :ठाकरे सिनेमानरेंद्र मोदीशिवसेनाउद्धव ठाकरे