Maharashtra Politics: “खोके सरकारला आता रेसकोर्स विकायचाय! जागा बिल्डरांना देण्याचा डाव”; आदित्य ठाकरेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 08:07 AM2023-01-10T08:07:36+5:302023-01-10T08:08:39+5:30
Maharashtra News: आम्ही ते होऊ देणार नाही. मुंबईकरांच्या हक्काची जमीन मुंबईकरांसाठीच वापरली जावी यासाठी आम्ही लढत राहू, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: महालक्ष्मी येथील रेसकोर्स मुलुंडला हलवून महालक्ष्मीला ‘थीम पार्क बांधण्या’ची योजना पालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. खोके सरकारला आता रेसकोर्स विकायचाय. महालक्ष्मी रेसकोर्सची जागा बिल्डरांना विकण्याचा सरकारचा डाव आहे, या शब्दांत आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. समजलेल्या माहितीप्रमाणे वरळी डेअरी बिल्डर्सच्या घश्यात घालण्यासोबतच रेसकोर्सची जागाही व्यावसायिक हितसंबंधांसाठी देण्याचा प्रयत्न सुरु आहे. या जागेवर ‘हाईडपार्क’ सारखे मोठे उद्यान व्हावे, जिथे आबालवृद्धांसाठी निसर्गाच्या सानिध्यात मोकळ्या जागी फिरण्याची सोय असावी, मुंबईकरांसाठीची ही सगळ्यात मोठी मोकळी जागा असावी अशी संकल्पना उद्धव ठाकरे जी यांनी मांडली होती. ही मुंबईकरांच्या हक्काची विनामूल्य असणारी जागा आता खोके सरकार व्यावसायिक हितसंबंध असणाऱ्यांच्या घश्यात घालू पाहतंय!, असे आदित्य ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
पण आम्ही ते होऊ देणार नाही!
पण आम्ही ते होऊ देणार नाही! मुंबईकरांच्या हक्काची इंच इंच जमीन मुंबईकरांसाठीच वापरली जावी ह्यासाठी आम्ही लढत राहू! असेही आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. दुसरीकडे, महालक्ष्मी रेसकोर्स हा मुंबई शहराचा अविभाज्य भाग आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून कोणत्याही बांधकामाशिवाय ‘द हाईड पार्क’सारखी मोकळी जागा असणारे उद्यान विकसित करण्याची योजना होती. ही जागा सर्वांसाठी मोफत उपलब्ध केली जाणार होती. मात्र खोके सरकार ही जागा बिल्डरच्या घशात घालू पाहतेय, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
दरम्यान, रेसकोर्स मैदानाचा भूखंड रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब या संस्थेला ९९ वर्षाच्या लिजवर देण्यात आला होता. या भूखंडाचा भाडेपट्टा करार २०१३ मध्ये संपला आहे. रेसकोर्सवरील एकूण ८ लाख ५५ हजार १९८ चौरस मीटर जागेपैकी २ लाख ५८ हजार २४५ चौरस मीटरची जागा पालिकेच्या मालकीची असून ५ लाख ९६ हजार ९५३ चौरस मीटरची जागा राज्य सरकारची आहे. राज्य सरकारच्या ताब्यातील जमीन ताब्यात घेण्यासाठी दहा वर्षांपासून पालिकेचे पुन्हा प्रयत्न सुरू आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"