लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र पुढे नेत होते, त्याला दृष्ट लागली. पाठीत खंजीर खुपसला गेला, गद्दारी केली गेली आणि सरकार स्थापन केले. मात्र, मागील आठ महिन्यांपासून राज्य अंध:काराकडे चालले आहे, अशा शब्दांत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली.
गोरेगाव येथे शिवगर्जना अभियानांतर्गत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात आदित्य ठाकरे बोलत होते. राज्यातील उद्योग गुजरात आणि इतर राज्यात गेल्याबद्दल सरकारवर टीका करताना मुख्यमंत्री कार्यालय हल्ली दिल्लीतून चालते, अशी टीकाही त्यांनी केली. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाहीला घातक आहे. माझ्यासमोर बसलेले शिवसैनिक ही एकच शिवसेना, असे सांगत त्यांनी शिंदे गटाला लक्ष्य केले. भाजपला विधान परिषद आणि विधानसभा पोटनिवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अनेक सर्व्हे त्यांच्या विरोधात जात आहेत, त्यामुळेच महापालिका निवडणुका होत नाहीत, असा दावा आदित्य यांनी यावेळी केला. अवकाळीमुळे शेतकरी अडचणी आहे. या सरकारने एकही पैसा शेतकऱ्यांना दिला नाही. मात्र आमच्या सरकारने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत केली, असे सांगत त्यांनी टीका केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"