Maharashtra Politics: राज्यात विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. शिंदे गटातील आमदार पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार आहेत. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) बिहार दौऱ्यावर जाणार असून, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची भेट घेणार आहेत. मात्र, तेजस्वी यादव यांच्या भेटीमागचे कारण काय, बिहार दौऱ्याचे प्रयोजन काय, अशा प्रश्नांवर आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली. कारण, एक पक्ष दुसऱ्या राज्याच्या प्रचारात व्यस्त आहे. त्यांनी आधी आमदार, मग प्रकल्प आणि आता मंत्री गुजरातला पाठवले. महाराष्ट्रात बेरोजगार, ओला दुष्काळ असे असंख्य प्रश्न असताना मंत्रिमंडळ तिकडे प्रचारात व्यस्त आहे. महाराष्ट्रासाठी एक तास दिला असता तर काही वाईट झाले नसते, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसेच बिहार दौऱ्याचा अजेंडाही सांगितला.
मागील अनेक दिवसांपासून तेजस्वी यादव आणि माझी फोनवर चर्चा
मागील अनेक दिवसांपासून तेजस्वी यादव आणि माझी फोनवर चर्चा सुरू आहे. आधी आमचे महाराष्ट्रात सरकार होते आणि ते बिहारमध्ये विरोधी पक्षात होते. तेव्हापासून आम्ही एकमेकांशी सल्लामसलत करत असतो. पहिल्यांदा आम्ही एकमेकांना भेटू. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा होईल. यात पर्यावरण, हवामान बदलाचे संकट, उद्योग अशा अनेक विषयांवर चर्चा होईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, ज्यांनी पीडीपीबरोबर युती केली त्यांनी आमच्यावर टीका करू नये. ज्यांच्या विरोधात भाषण केली, त्यांच्याबरोबर जाऊन बसले त्यांनी आम्हाला शिकवू नये. राज्यपाल महाराष्ट्राचे असून त्यावर टिका करतात, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? तुम्ही उपमुख्यमंत्री आहात तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा आणि राज्यपालांवर काय कारवाई करणार ते सांगा, असा सवाल आदित्य यांनी राज्यपालांच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी विचारला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"