Aaditya Thackeray On Union Budget 2023: लोकसभा निवडणुकीआधीचा शेवटचा पूर्णवेळ अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. यामध्ये मध्यमवर्गाला दिलासा मिळण्यासाठी करसवलतीची मर्यादा ५ लाखांवरून ७ लाख करण्यात आली आहे. याशिवाय काही गोष्टी महाग झाल्यात, तर काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. विरोधकांकडून टीका केली जात आहे. शिवसेनेकडूनही या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काय मिळाले, अशी विचारणा ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.
अलीकडेच गुजरात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. १५० हून अधिक जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत. ज्या राज्यातून वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस, गीफ्ट सिटी, फायनान्शिअल सेंटर तिथे गेले आहे. इतकेच नव्हे तर अधिकच्या सवलतीही देण्यात आलेल्या आहेत. सूरतला डायमंड हब मिळाले आहे. पण ज्या महाराष्ट्रातून जिथे जिथे, ज्या राज्यात उद्योग नेले, त्याच महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.
मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचे आणि काहीच द्यायचे नाही, हेच या बजेटमधून दिसले
कर्नाटकात आता विधानसभेच्या निवडणुकात आहेत. जनमत चाचणी अंदाजातून अपेक्षित जागा येतील, असे त्यांना दिसत नाही. तिथे खर्च दाखवलेला आहे. परंतु, राष्ट्रीय बजेटमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख कुठेही आलेला दिसला नाही. मुंबईचा उल्लेख कुठे आलेला दिसला नाही. मुद्दा असा आहे की, घटनाबाह्य पद्धतीने ओढा-ताण करून सरकार बनवले आहे. तरी महाराष्ट्राला, मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचे आणि काहीच द्यायचे नाही, हेच या बजेटमधून दिसले, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
महिला, तरुणांसाठी अर्थसंकल्पात काहीच नाही
बाकीच्या दाव्यांमध्ये मी जाणार नाही. महिला, तरुणांसाठी या बजेटमध्ये स्पेसिफिक दिले आहे, असे वाटले नाही. नॅशनल डिजिटल लायब्ररी वगैरे सगळे ठीक आहे. पण आज जग गुगलवर आलेले आहे. काही जुन्या घोषणा तशाच सुरू आहेत. कर्नाटकासाठी अप्पर भद्रा रिजनमध्ये काम करणार असल्याचे सांगितले. परंतु, वर्षानुवर्षे यांचेच सरकार आहे. तरीदेखील आता तिथे देण्याची गरज काय, निवडणुका येतायत म्हणून दिले जातेय. दुसऱ्या कोणत्याही राज्यांचा उल्लेख केलेला नाही. परंतु महाराष्ट्राला काहीच मिळालेले नाही, या शब्दांत आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"