लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना उद्धवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि भाजपचे राम कदम यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेतल्यामुळे भास्कर जाधव संतप्त झाले. उद्धव ठाकरे सभागृहात नसताना नाव का घेतले? असा प्रश्न जाधव यांनी विचारला.
राम कदम म्हणाले, मुंबईत कोरोना काळात अकरा हजार मुडदे पडले. त्याला उद्धवसेना आणि तेव्हाचे सरकार जबाबदार आहे. मुख्यमंत्री सहायता निधी उद्धव ठाकरे यांनी का बंद केला? त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता निधी सुरू केला. कोरोना काळात मुंबईत कोव्हिड येण्यापूर्वी एकही व्हेंटिलेटर नव्हते. तेव्हा मी उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली की, आपण व्हेंटिलेटरची व्यवस्था करा. त्या वेळच्या सरकारने ही व्यवस्था केली असती तर ११ हजार लोकांचा मृत्यू झाला नसता.
राम कदम यांच्या या आरोपानंतर उद्धवसेनेच्या आमदारांनी सभागृहात कदम यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. आरोपांना उत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले, राम कदम यांनी उद्धव ठाकरेंचे वारंवार नाव घेतले, वाट्टेल ते आरोप केले. तुम्ही आम्हाला बोलायला संधी देणार नसाल तर आम्ही तुमच्यासमोर डोके फोडायचे का? उद्धव ठाकरे विधानसभेचे सदस्य नाहीत, सदस्य नसेल त्यांचे नाव घेऊन आरोप करता येत नाहीत हा नियम आहे.
उद्धवसेनेचे सुनील प्रभू म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ७९३ कोटींची वाढ केली. फडणवीस यांच्या पाच वर्षांच्या काळात ६१४ कोटींची वाढ झाली, तर एकनाथ शिंदेंनी ६५ कोटींची वाढ केली.