“लोकसभेची एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी अन् जिंकून दाखवावी”; उद्धव ठाकरेंचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 03:00 PM2023-12-05T15:00:32+5:302023-12-05T15:06:15+5:30

Shiv Sena Chief Uddhav Thackeray News: पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूक घ्यावी आणि ती बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावी, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

shiv sena thackeray group chief uddhav thackeray challenge to central govt to take lok sabha election 2024 on ballot paper | “लोकसभेची एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी अन् जिंकून दाखवावी”; उद्धव ठाकरेंचे आव्हान

“लोकसभेची एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी अन् जिंकून दाखवावी”; उद्धव ठाकरेंचे आव्हान

Shiv Sena Chief Uddhav Thackeray News: तुमची एवढी लाट आहे, तर त्या लाटेमध्ये एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. म्हणजे आमच्या मनात शंका नको. सगळे वातावरण विरोधात असताना आणि एक्झिट पोल जे येत होते, ते उलटे-पालटे करणारे निकाल लागत असताना, हे कसे घडले, असा प्रश्न मतदाराला पडणार असेल तर त्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी दम असेल तर एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असे जाहीर आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. 

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पाच राज्यातील विधानसभा निवडणुका झाल्या, यामध्ये भाजपला मिळालेल्या विजयाबाबत शंका उपस्थित केली. शिवसेना कितीही फोडायचा प्रयत्न केला, तिला प्रशासनातून बाजूला काढायचा प्रयत्न केला, तरी शांत राहणार नाही. देशातील पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या. भाजपला भरघोस यश मिळाले. माझे आव्हान आहे की, पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूक घ्या. ही निवडणूक वर्ष ते दीड वर्षे पुढे ढकलली आहे. सिनेटची निवडणूक लांबवली जात आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 

लोकसभेची एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी अन् जिंकून दाखवावी

लोकसभा ही देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तर मतमोजणीसाठी वेळ लागेल हे मान्य आहे. मात्र, स्थानिक निवडणुका ज्या पद्धतीने लांबवल्या जात आहेत, त्यापुढे मतमोजणीसाठी लागणारा विलंब काहीच नाही. मतमोजणीसाठी दोन ते तीन दिवस लागले तर काय फरक पडतो. तुमच्यात एवढा आत्मविश्वास असेल आणि हिंमत असेल तर उद्या होणारी लोकसभेची एकच निवडणूक देशभरात बॅलेट पेपरवर घेऊन जिंकून दाखवावी, असे खुले आव्हान उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिले आहे. तसेच ते नाही, तर मुंबई महापालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. हा विषय मुंबईकरांच्या गळ्याशी आलेला आहे आणि हा फास तोडल्याशिवाय शिवसेना गप्प राहणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. 

दरम्यान, शिवसेना प्रशासनात नाही, त्यामुळे मोकळे रान मिळाले, असे ज्यांना वाटत असेल, त्यांना वठणीवर आणण्याचे काम शिवसेना करणार आहे. त्यासाठी १६ डिसेंबर रोजी धारावी ते अदानी ग्रुपच्या कार्यालयावर विराट मोर्चा नेला जाणार आहे, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. 
 

Web Title: shiv sena thackeray group chief uddhav thackeray challenge to central govt to take lok sabha election 2024 on ballot paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.