Uddhav Thackeray Live: कोणी कितीही मोठा नेता असू द्या, अगदी मोदी असले तरीही महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंशिवाय मत मिळू शकत नाही. हे जनतेने मान्य केले आहे. हे मोदींनाही मान्य करावे लागले आहे. मोदी का आदमी पण चेहरा बाळासाहेबांचा. असे का, अशी विचारणा करत, तुम्हाला आव्हान देतो जर हिंमत असेल तर निवडणुका घ्या. आम्ही बाळासाहेबांचा फोटो घेऊन येतो. तुम्ही मोदींचा फोटो घेऊन या. बघू लोक कुणाला मत देतात? या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त खास कार्यक्रम मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. निवडणूक जिंकायची असेल तर बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही हे आजही सत्य आहे. पंतप्रधान मोदी यांनाही ते मान्य आहे. त्यामुळेच तर खोकेवाले बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरत आहेत. आम्ही बाळासाहेबांचा फोटो घेऊन येतो. तुम्ही मोदींचा फोटो घेऊन या. बघू लोक कुणाला मत देतात? तुम्हाला आव्हान देतो जर हिंमत असेल तर निवडणुका घ्या, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
आमने-सामने यायची आमची तयारी आहे
आता होऊन जाऊ द्या. आमने-सामने यायची आमची तयारी आहे. आम्ही बाळासाहेबांचा फोटो घेऊन येतो, तुम्ही मोदींचा फोटो घेऊन या. पाहुया, महाराष्ट्र कोणाच्या बाजूने जातो, असे जाहीर आव्हान उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना दिले. निवडणुकीला सामोरे जायची हिंमत नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. पंतप्रधान मोदींनी येऊन आपण केलेल्याच कामांचे उद्घाटने केले. मात्र, मोदी येऊन बोलले ते भयानक आहे, हा डाव मुंबईकरांनी लक्षात घ्यायला हवा. बँकेत पैसा ठेवून विकास होत नाही, तो विकासासाठी वापरला पाहिजे, असे ते म्हणाले. पण, ही गोष्ट आम्हाला कळत नाही का, असा चिमटा उद्धव ठाकरेंनी काढला.
सर्वांच्या प्रयत्नांमुळे आजच्या ठेवी दिसत आहेत
मुंबई महानगरपालिकेच्या एफडीत एवढे काय आहे. कोणी काहीही आकडे देतात. २००२ पर्यंत मुंबई महानगरपालिका तोट्यात होती. मात्र, सर्वांच्या प्रयत्नांमुळे आजच्या ठेवी दिसत आहेत. मात्र, राज्यातील उद्योग बाहेर जातायत. शेजारच्या राज्यातील मुख्यमंत्री येऊन लाखो कोटींचे प्रकल्प नेतायत. पण आमचे मुख्यमंत्री दावोसला जाऊन बाकरवडीच्या उद्योगांचे करार केले, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. तसेच मुंबई महानगरपालिकेतील ठेवी या जनतेचा पैसा आहे. याच ठेवींच्या पैशातून कोस्टल रोड प्रकल्प साकारला जात आहे. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा टोल लागणार नाही. देशातील पहिली श्रीमंत महापालिका असेल, जी स्वखर्चातून एवढ्या मोठ्या प्रकल्पाचे काम करत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
दरम्यान, यासाठीच यांना मुंबई हवी आहे. तुमच्यासाठी मुंबई सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असेल, मात्र आम्ही तिला मातृभूमी म्हणून जपतोय. यांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापायची आहे, मुंबईला भिकेला लावायचे आहे. मुंबईला कंगाल करायचे आहे. बुरी नजरवालें तेरा मुंह काला, असे बोलायची वेळ आली आहे. आणि बुरी नजर वाल्यांचे मुँह आम्ही काळे करणारच, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"