Raigad Irshalwadi Landslide Incident: मुंबई-पुणे महामार्गावर चौकजवळ मोरबे धरणाला लागून असलेला इर्शाळगड सर्वांचे लक्ष वेधून घेतो. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या इर्शाळगडाच्या कुशीत वसलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळून घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. दिवसभरात २० लोकांचे मृतदेह सापडले आहेत, तर ११९ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. यातच आता शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे इर्शाळवाडीला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
खालापूर तालुक्यातील मोरबे धरणाला लागून असलेल्या डोंगरावरील या गावाला वर्षानुवर्षे समस्यांचा विळखा पडला होता. गावात जाण्यासाठी रस्ता नाही. वीज नाही, सौरऊर्जेच्या अपुऱ्या प्रकाशात कसेबसे जगावे लागत आहे. प्राथमिक शिक्षणाचीही सोय नसल्यामुळे पहिलीपासून मुलांना आश्रमशाळेचा आधार घ्यावा लागतो. दुर्घटना झाल्याच्या दुसऱ्या दिवशीही मदत आणि बचावकार्य मोठ्या प्रमाणावर सुरू होते. मात्र, मुसळधार पावसामुळे यात अडथळे येत आहेत. यातच आता उद्धव ठाकरे इर्शाळवाडी येथे जाणार असल्याचे समजते.
उद्धव ठाकरे दुर्घटनाग्रस्तांची भेट घेणार
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे शनिवारी इर्शाळवाडी गावाला भेट देणार आहेत. ते पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहेत, असे समजते. रायगडच्या खालापूर येथे इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली. या दुर्दैवी दुर्घटनेमुळे ठाकरे गटाचा उत्तर भारतीय मेळावा तूर्तास रद्द करण्यात आला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाचा ठाण्यात उत्तर भारतीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. पण हा मेळावा तूर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये होणारा उत्तर भारतीय मेळावा तूर्तास रद्द करण्यात आला आहे. हा मेळावा आता पुढच्या आठवड्यात होईल, अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली.