Join us

“शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा”; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 4:26 PM

Uddhav Thackeray News: विमा कंपन्या शेतकऱ्यांना दाद देत नाहीत. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

Uddhav Thackeray News: राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. काही ठिकाणी अत्यल्प पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची उत्पादकता निम्यापेक्षा खाली आली आहे तर काही ठिकाणी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यभरातून शेतकऱ्यांनी पिकविम्यासाठी ऑनलाईन तक्रारींद्वारे पीकविमा कंपन्यांना मदतीसाठी हक्काच्या पिकविम्यासाठी आर्जव केले आहे मात्र विमा कंपन्या शेतकऱ्यांना दाद देत नाही आहेत. त्यामुळे राज्यभरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतकेंद्रे उभारा आणि शेतकऱ्यांना पीकविमा मिळतोय की नाही याची माहिती घेऊन तो मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना, शिवसेनेमार्फत शेतकऱ्यांना शक्य ते सर्व सहकार्य करण्याबाबतच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजना आणली. खरीप हंगाम नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास अथवा तयार पीकाचे अतिवृष्टी अथवा इतर कारणामुळे नुकसान झाल्यास ७२ तासाच्या आत शेतकरी विमा कंपनीकडे ऑनलाईन अथवा ऑफलाईन तक्रार करू शकतो. त्यानंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधीने शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसानभरपाई दिली जाईल असे आश्वासन दिले गेले होते, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा

मात्र विमा कंपन्या याबाबत टाळाटाळ करत असल्याचे समोर येत आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेत शेतकऱ्याला विमा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अग्रीम २५ टक्के मदत देणे बंधनकारक आहे. मात्र याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून मदत मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या मदत केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असे आवाहनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याप्रसंगी केले.

दरम्यान, शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होता येते. राज्यातील जवळपास २४ जिल्ह्यातील ८९० महसुली परिमंडळात पावसाचा खंड जवळपास २५ दिवस पडला होता त्यात आणि त्यानंतर आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा कंपन्या वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत, याकडे शिवसैनिकांनी लक्ष घालून त्या पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी असे आवाहनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

 

टॅग्स :उद्धव ठाकरेशेतकरीशिवसेना