Uddhav Thackeray: “प्रकाश आंबेडकरांसोबतची चर्चा सकारात्मक, लवकरच अंतिम निर्णय”; उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 07:58 PM2022-12-05T19:58:25+5:302022-12-05T19:59:08+5:30

Uddhav Thackeray: प्रकाश आंबेडकरांसोबत झालेल्या भेटीत नेमके काय झाले, याची सविस्तर माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

shiv sena thackeray group chief uddhav thackeray reaction on meeting with prakash ambedkar for alliance | Uddhav Thackeray: “प्रकाश आंबेडकरांसोबतची चर्चा सकारात्मक, लवकरच अंतिम निर्णय”; उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट

Uddhav Thackeray: “प्रकाश आंबेडकरांसोबतची चर्चा सकारात्मक, लवकरच अंतिम निर्णय”; उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट

googlenewsNext

Uddhav Thackeray: एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधाने आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या युतीवरून चर्चा झाली. याबाबत उद्धव ठाकरे यांनी सविस्तर माहिती दिली. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतची चर्चा सकारात्मक असून, लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी महाविकास आघाडीकडून १७ डिसेंबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना प्रकाश आंबेडकर यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत प्रश्न विचारले. यावर उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करत महत्त्वाची माहिती दिली. 

लवकरच आम्ही आमचा निर्णय जाहीर करू 

उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत माझी चर्चा झाली. ती नक्कीच चांगली सकारात्मक आहे. या चर्चेतील बारकावे आणि काही गोष्टी आम्ही लवकरात लवकर निकाली लावू. पुढे जाऊन काही अडता कामा नये. आमची युती किंवा एकत्र येणे असेल, ते लवकरच आम्ही जाहीर करू, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. 

प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचा भाग होणार का?

प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचा भाग होणार का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, त्यांची येण्याची मानसिकता आहे. त्यांचे काही विषय आहे, ते विषय जटील आहे, असे नाही. पण ते सगळे विषय संपवू. जसे आम्ही एकत्र आलो. मित्र पक्ष एकत्र आले. तसे येऊ. महाविकास आघाडी होताना एक-दोन नाही, तर अनेक बैठका झाल्या. यावेळी अनेक मुद्द्यांवर योग्य पद्धतीने चर्चा करण्यात आली. कोणते विषय भविष्यात अडचणीचे ठरू शकतात किंवा अडचणीत टाकणारे विषय आहेत का, यावर सखोल चर्चा करण्यात आली. नंतरच महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे आलो. महाविकास आघाडीत आम्ही केवळ सरकार स्थापण्यासाठी एकत्र आलेलो नाही. कटकारस्थान करून आमचे सरकार पाडले, तरीही एक सक्षम विरोधीपक्ष म्हणून आम्ही एकत्र आहोत. प्रकाश आंबेडकर यांचीही तशीच मानसिकता आहे. पुढे जाऊन काही अडचणीचे मुद्दे येऊ नयेत, यासाठी चर्चा सुरू असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्याचे राज्यपाल आणि सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत आहे, शिवरायांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलं जात आहे, सीमाभागातील गावांवर कर्नाटकडून दावा केला जात आहे. फुटीरतेची बीजं इथं पेरली जात आहेत. राज्यपालांना महाराष्ट्राची अस्मिता, महत्व कमी करायचे आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसत आहे. त्याविरोधात येत्या १७ तारखेला जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shiv sena thackeray group chief uddhav thackeray reaction on meeting with prakash ambedkar for alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.