Join us

Uddhav Thackeray Live: बाळासाहेबांच्या तैलचित्रावरुन उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल; उपस्थित केला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 7:57 PM

Uddhav Thackeray Live: बाळासाहेबांचे तैलचित्र लावत आहेत. त्याचा अभिमान आहे. पण त्यामागचा हेतू वाईट आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

Uddhav Thackeray Live: तेच चैतन्य, तोच उत्साह आणि तीच गर्दी आजही पाहायला मिळत आहे. खोक्यांनी गद्दार विकले जाऊ शकतात, सच्चा कार्यकर्ता विकला जाणार नाही. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आपल्या शिवसेनेसोबत आले आहेत. वारसांचे आणि विचारांचे नातू एकत्र आलेत, असे सांगतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत लावल्या गेलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्रावरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

शिवसेना प्रमुखांच्या पुतळ्याला वंदन करून आलो. विधानभवनात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण होत आहे. दुपारी मला या तैलचित्राच्या अनावरणाबाबत विचारण्यात आले. त्यावर मी म्हणालो की, मी बघितलेले नाही. ज्या कलाकाराने ते चित्र चितारले असेल, त्यांचा मला अपमान करायचा नाही. परंतु त्यांना योग्य तेवढा वेळ दिला आहे का, हे त्यांना विचारणे गरजेचे आहे. कारण घाईगडबडीमध्ये काहीतरी रंगवून ठेवायचे आणि हे तुझे वडील, असे सांगायचे. हे अजिबात चालणार नाही, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी तैलचित्रावरून नाराजी व्यक्त केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त खास कार्यक्रम मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

दुसऱ्यांचे वडील चोरताना स्वतःच्या वडिलांना विसरू नका

दसरा मेळाव्यात वडील चोरणारी टोळी म्हटले होते. मात्र, आता दुसऱ्यांचे वडील चोरताना स्वतःच्या वडिलांना विसरू नका, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला. तसेच प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आले आहेत. काही दिवसांपूर्वी रामदास आठवले एकत्र आले होते. पण त्यानंतर ते भाजपच्या कळपात गेले. आज दोन्ही वारसाचे आणि विचारांचे नातू एकत्र आले आहेत. दोघे नातू एकत्र आल्यानंतर जे डोक्यावर बसेल, त्याला सांगणार जा तू. आता तुझे काही काम नाही. कारण देश हुकूमशाहीच्या दिशेला चालला आहे. हिंदुत्वाच्या आधारावर धोक्याची भिंत उभी करायची आणि त्याआडून देशावर पोलादी पकड घट्ट बसवायची, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 

दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार असताना सरकार का पाडले? तर हिंदुत्व सोडले आणि शरद पवारांच्या आहारी गेले. आणि काल सांगतात की, शरद पवार खूप गोड माणूस. मी फोनवर त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. मग मी काय घेत होतो? ही अशी सगळी माणसी आहेत. तुमची कृती चांगली आहे. बाळासाहेबांचे तैलचित्र लावत आहेत. त्याचा अभिमान आहे. पण त्यामागचा हेतू वाईट आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :उद्धव ठाकरेबाळासाहेब ठाकरेशिवसेना