Shiv Sena Uddhav Thackeray Group: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी भोपाळमधून ताब्यात घेतले. हिरे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी शिवसेनाउद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी थेट इशाराच दिला आहे.
अद्वय हिरे यांनी रेणुका सूतगिरणीकडून साडेसात कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने ३० कोटींच्या वर रक्कम गेली होती. त्यामुळे हिरे यांच्यावर ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. उच्च न्यायालयाने जामीन नाकारला होता. हिरे हे सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच ठाकरे गटात प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे यांना पत्रकार परिषदेत अद्वय हिरे यांना झालेल्या अटकेबाबत प्रश्न विचारण्यात आला.
आमचे सरकार आल्यावर सगळ्यांचा हिशोब करणार
अद्वय हिरे यांच्या पाठिशी संपूर्ण पक्ष आहे. अद्वय हिरे यांच्यावर कारवाई केली जाते. पण, आम्ही आरोप करणाऱ्यांची चौकशीही होत नाही. आमचे सरकार आल्यावर सगळ्यांचा हिशोब करणार, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. दुसरीकडे, अद्वय हिरे यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने अद्वय हिरे यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. अद्वय हिरे अटकेप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही जोरदार टीका केली.
अद्वय हिरेंची अटक राजकीय दबावतंत्रातून
अद्वय हिरेंची अटक राजकीय दबावतंत्रातून झाली आहे. त्यांच्यावरील आरोप भाजपमध्ये असताना आणि त्याआधीही होते. पण, शिवसेनेत आल्यावर मालेगावात उद्धव ठाकरेंची सभा घेतली आणि मतदारसंघ ढवळून काढला. पराभवाच्या भीतीने मंत्री महोदयांनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून अद्वय हिरे आणि कुटुंबीयांविरोधात ४० च्याआसपास गुन्हे दाखल केले आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, गिरणा सहकारी साखर कारखान्याच्या शेअर्समध्ये १७८ कोटींची अफरातफर केल्याचा आरोप दादा भुसेंवर आहे. याबाबत ईडी, सीबीआय यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. मग, दादा भुसेंवर काय कारवाई झाली? असा प्रश्नही संजय राऊतांनी विचारला आहे.