Uddhav Thackeray: एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधाने आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यातच महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महाविकास आघाडीकडून १७ डिसेंबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधताना, सरकारने आधी जमत नाही म्हणून जाहीर करावे. मग सरकार चालवण्यापासून ते बेळगावला जाईपर्यंतची सगळी जबाबदारी मी घेतो, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
राज्यपाल आणि सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्ये केली जात आहे. सीमाभागातील गावांवर कर्नाटकडून दावा केला जात आहे. फुटीरतेची बीजे इथे पेरली जात आहेत. राज्यपालांना महाराष्ट्राची अस्मिता, महत्व कमी करायचे आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसत आहे. त्याविरोधात येत्या १७ तारखेला जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले. तसेच शिंदे-फडणवीस सरकारच्या भूमिकेचा समाचरही घेतला.
सरकारने जमत नाही म्हणून जाहीर करावे
यावेळी पत्रकारांनी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने काही नेते बेळगावात जाणार का, याबाबत उद्धव ठाकरेंना विचारले. यावर, यापूर्वी छगन भुजबळ, संजय राऊत यांच्यासह अनेक नेते बेळगावात जाऊन आले आहेत. तसेच सरकारने जमत नाही म्हणून जाहीर करावे. मग आम्हाला काय करायचे आहे, ते आम्ही करतो. सरकार चालवण्यापासून ते अगदी बेळगावला जाईपर्यंतची सगळी जबाबदारी मी घेतो, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
दरम्यान, राज्यात अस्तित्वात आलेल्या बेकायदेशीर सरकारमुळे राज्याची अस्मिता धुळीस मिसळत आहे. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडे जात आहेत. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गावांवर दावा केला आहे. पुढच्या वर्षी कर्नाटकची निवडणूक असल्याने महाराष्ट्रातील गाव तोडणार का? या सगळ्यावरून राज्यात मुख्यमंत्री आहेत का असा प्रश्न पडतोय, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"