Shiv Sena Thackeray Group: मुंबई महापालिका, मुंबई शहर एका बाजूला सध्याचे दिल्लीश्वर लुटत आहेत, तर दुसऱ्या बाजूला भाजप व त्यांची मिंधे पिलावळही लुटमार करीत आहे. तपास यंत्रणा या घोटाळय़ांकडे डोळेझाक करीत आहेत. अशा वेळी मुंबई महापालिकेच्या रक्षणासाठी जनता रस्त्यावर उतरत आहे. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मुंबईस ओरबाडण्यासाठी सगळे महाराष्ट्रद्वेष्टे एक झाले आहेत. मुंबई हे महाराष्ट्राच्या भाळावरील ठसठशीत कुंकू आहे, मुंबई हेच महाराष्ट्राचे सौभाग्य! ते सौभाग्य अखंड राखण्यासाठी उद्याचा विराट मोर्चा धडकणार आहे. मुंबईकरांची ही ताकद पाहून दिल्लीलाही हादरे बसू द्या!, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने म्हटले आहे.
पहिल्याच मुसळधार पावसाने मुंबई आणि मुंबईकरांची दैना उडाली आहे. भ्रष्टाचाराने मुंबई तुंबल्याचा हा परिणाम. महाराष्ट्राच्या राजधानीत गेल्या दोन वर्षांपासून लोकप्रतिनिधींचे सरकार नाही, महापौर नाहीत, विषय समित्या नाहीत. अधिकाऱ्यांना हाताशी धरून मनमानी पद्धतीने मुंबईचा जो कारभार सध्या चालला आहे त्यास फक्त लुटमार असेच म्हणता येईल. मुंबईचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्व कमी करण्याचे उघड प्रयत्न सुरूच आहेत. त्यात आता मुंबई विद्रूप आणि कंगाल करून मुंबईची उरलीसुरली इभ्रत धुळीला मिळविण्याचे काम फडणवीस – मिंधे सरकार करीत आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केली आहे.
खरे सूत्रधार हे ‘खोके’ सरकारचे मुख्यमंत्री व त्यांचे कुटुंबीय आहेत
मुंबई म्हणजे मुंबादेवी ही महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेची माऊली, पण मिंध्यांसाठी मुंबई म्हणजे ‘एटीएम’ किंवा सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. भाजप अंडी खात आहे व मुख्यमंत्री मिंधे यांनी सरळ कोंबडी कापून खाण्याचे ठरवले आहे, ते मोदी-शहांच्या इशाऱ्यावर. लुटमारीचे रोज एक नवे प्रकरण समोर येत आहे. त्यांच्यामागचे खरे सूत्रधार हे ‘खोके’ सरकारचे मुख्यमंत्री व त्यांचे कुटुंबीय आहेत, असा मोठा आरोप ठाकरे गटाने केला आहे. ८८ हजार कोटींच्या ठेवी मुंबई पालिकेने सुरक्षित ठेवल्या. या ८८ हजार कोटींच्या ठेवी लुटून खाण्याचे कारस्थान सुरू आहे. या ठेवी मोडण्याचा प्रकार गंभीर आहे, अशी टीका करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईची ड्रेनेज व्यवस्था इंग्रज काळातली आहे व त्यावरचा ताण कमालीचा वाढला आहे. त्यामुळे मुंबईचा ‘जोशीमठ’ व्हायला वेळ लागणार नाही, अशी भीती व्यक्त करण्यात आली असून, मुंबई-ठाण्याच्या जनतेचे पहिल्याच पावसात जे हाल झाले ते गेल्या वर्षभरात झालेल्या घोटाळ्यामुळे. रस्ते खड्ड्यात, नालेसफाई पूर्ण बोंबलली. या काळात मुंबई-ठाण्यासह सर्वच महानगरपालिकांत झालेले आर्थिक व्यवहार म्हणजे फक्त घोटाळेच घोटाळे आहेत. मुंबई महापालिका, मुंबई शहर एका बाजूला सध्याचे दिल्लीश्वर लुटत आहेत, तर दुसऱ्या बाजूला भाजप व त्यांची पिलावळही लुटमार करीत आहे, या शब्दांत ठाकरे गटाने हल्लाबोल केला आहे.