Join us  

Maharashtra Politics: “लढाई संपलेली नाही, २०२४ पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल”; संजय राऊतांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 2:17 PM

Maharashtra News: माझ्यावर आरोप करणे, जितेंद्र आव्हाडांबद्दल खोटे प्रकरण पुढे रेटणे यामुळे कोणाला काय विकृत आनंद मिळतोय हे मला समजत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: मुंबईतील पत्राचाळ कथित घोटाळ्याप्रकरणी जामिनावर बाहेर आलेले शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. लढाई अद्याप संपलेली नाही. २०२४ पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल, अशी मला खात्री आहे, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला. 

काही दिवसांपूर्वी पत्राचाळ कथित गैरव्यवहाराप्रकरणी विशेष पीएमएएल न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला. याविरोधात ईडीने हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होते. आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आल्यावर शिवसैनिकांनी मोठ्या जल्लोषात संजय राऊतांच्या सुटकेचा आनंद व्यक्त केला. यानंतर पुन्हा एकदा संजय राऊत यांनी बंडखोर आमदार आणि शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले.

२०२४ पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल

ही लढाई संपलेली नाही. माझ्यासारख्या माणसाविरुद्ध सतत अशा खोट्या कारवाया होत राहणार, हे मला माहिती आहे. त्यामुळे ही न संपणारी लढाई आहे २०२४ पर्यंत. आम्हाला पूर्ण खात्री आहे की २०२४ पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल. हे मी सांगतो आहे आणि मी माझ्या या भूमिकेवर ठाम आहे. मी बाहेर असेन किंवा या लोकांनी मला परत बंद केलेले असेल पण माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

शिवसैनिकांच्या रक्ताची किंमत स्वस्त नाही

ठाण्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाल्याची घटना घडली. असे प्रकार नारायण राणे शिवसेना सोडून गेल्यानंतरही झाले होते. पण आज ते कुठेही नाहीत. शिवसेना मात्र अजूनही आहे. ठाण्यात जे घडले ते सत्ता आणि पोलिसांच्या बळावर घडत आहे. अशा प्रकारे हल्ले घडवून शिवसैनिकांचे रक्त सांडण्याचं काम जर केलं जात असेल तर मी सांगतो की शिवसैनिकांच्या रक्ताची किंमत स्वस्त नाही. शिवसैनिकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब गेल्या ५० वर्षात प्रत्येकाला द्यावा लागला आहे, असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी बोलताना दिला. 

दरम्यान, माझ्यावर आरोप करणे, जितेंद्र आव्हाडांबद्दल खोटे प्रकरण पुढे रेटणे यामुळे कोणाला काय विकृत आनंद मिळतोय हे मला समजत नाहीये. हे सगळे थांबायला हवे. पुन्हा एकदा महाराष्ट्राने परंपरेनुसार निर्मळ आणि पारदर्शक राजकारण करायला हवे. नवाब मलिक आणि इतरही लोक हळूहळू बाहेर येतील. लोकांमधील उद्रेक आता दिसू लागला आहे. चुकीच्या कारवायांवर न्यायालयाचे हातोडे पडू लागले आहेत. वारंवार खोटे प्रयोग सुरू राहिले तरी आम्ही वारंवार लढा देतच राहू, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :संजय राऊतमहाविकास आघाडी