Join us  

सूरज परमार आत्महत्या, एसआयटी चौकशी करा; खासदार संजय राऊत यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 6:43 AM

दिशा सालीयन प्रकरणात आदित्य ठाकरेंचा उल्लेख करण्यात आला. याला उत्तर म्हणून संजय राऊतांनी सूरज परमारांच्या आत्महत्येचा विषय काढत शिंदे गटाला लक्ष्य केले. 

लोकमत न्यूज नेटवर्क  

मुंबई : दिशा सालीयन आत्महत्या प्रकरणात शिंदे गटातील खासदार-आमदारांकडून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आला. याला उत्तर म्हणून आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येचा विषय काढत शिंदे गटाला लक्ष्य केले आहे. ठाण्यातील सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर एक डायरी सापडली, त्यात सांकेतिक नावे कुणाची आहेत. याची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी करीत त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला.

राऊत म्हणाले, ठाण्यातील बिल्डर परमार यांच्या आत्महत्येनंतर जी डायरी सापडली त्यात सांकेतिक नावे आहेत. ती नावे कोणाची आहेत ती आम्हाला माहिती आहेत. त्यामुळे या प्रकरणाचीही एसआयटी चौकशी करावी. सत्ताधारी फक्त विरोधी पक्षांवरच एसआयटी लावत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.   

सगळ्या चौकशांना सामोरे जाऊ शकतो   

सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी उद्धव ठाकरे गटाने केली आहे. हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. सगळ्या चौकशांना आम्ही सामोरे जाऊ शकतो. आमचे पारदर्शक सरकार आहे. ठाकरे गटाला फक्त आरोप करीत राजकारण करायचे आहे. एक आरोप केला होता, त्यात तोंडघशी पडले. कोर्टाने त्यांना जागा दाखवली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री   

‘एयू’ला काऊंटर करण्यासाठी ईएस’ 

खासदार संजय राऊत, विनायक राऊत यांना पक्ष लयाला चालला, संपत चालला याकडे पाहण्यास वेळ नाही. राेज काही तरी विषय लागतो, म्हणून ए. यू. नावाला काऊंटर करण्यासाठी ईएसचा विषय त्यांनी पुढे केला, असा आरोप शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट यांनी केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :संजय राऊतएकनाथ शिंदे