Sanjay Raut News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. विरोधी पक्षांची भाजपविरोधात इंडिया आघाडीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागांसाठीची चाचपणी काही पक्षांनी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याबाबत विचारले असता संजय राऊतांनी सूचक विधान केले आहे.
संजय राऊत हे मुंबईतील ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे गटासह महाविकास आघाडीत जोरदार हालचाली सुरू झाल्या असल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत यांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवल्यास त्यांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक असेल असे सांगितले जात आहे. संजय राऊत हे राज्यसभेवर चार वेळा निवडून आले आहेत. मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर संजय राऊतांनी सूचक प्रतिक्रिया दिली.
तुम्ही ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार का?
पक्षादेशाचे पालन करेन. पक्षाने आदेश दिला तर मी तुरुंगातही जातो. आम्ही बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेले लोक आहोत. पक्षाची गरज व पक्षप्रमुखांचा आदेश जो असेल तो मानणाऱ्यांपैकी मी आहे. मला विचारले ईशान्य मुंबईतून तुम्ही निवडणूक लढवणार का. मी म्हटले पक्षाने आदेश दिला तर मी काहीही करीन. ईशान्य मुंबईत संजय राऊत सोडून द्या, आमचा साधा शिवसैनिक जरी निवडणुकीला उभा राहिला, तरी तो दोन ते सव्वादोन लाख मतांनी निवडून येईल, अशी स्थिती आहे. तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तिथे सातत्याने शिवसेनेच्या सहकाऱ्याने भाजपाचे खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे तिथे आमच्यातील साधा पदाधिकारी, कार्यकर्ता जरी उभा केला, तरी तिथून शिवसेनेचाच खासदार निवडून येईल, असा दावा संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, ईशान्य मुंबईतून संजय राऊत यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्यास मनोज कोटक विरुद्ध संजय राऊत असा सामना रंगताना पाहायला मिळू शकतो. माझ्यावर पक्षाची व्यूहरचना करण्याची जबाबदारी आहे. इतर उमेदवारांचा प्रचार करून त्यांना बळ देण्याची जबाबदारी आहे. मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो तर एका मतदारसंघात अडकून बसेल. त्यामुळे पक्षाच्या व्यूहरचनेकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्याचा पक्षाला फटका बसू शकतो, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.