Join us

Maharashtra Politics: “खोके, पेट्या, पाकिटे हीच या लोकांची रणनीति”; संजय राऊतांची शिंदे गटावर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 11:48 AM

Maharashtra News: या लोकांचे काय करायचे हे मतदार ठरवतील. खोकेवाले कधी येतायत, याची आता जनता वाट पाहात आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Maharashtra Politics: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाकडून जोरदार तयारीला सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटाला शह देण्यासाठी शिंदे गटातील १२ नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. खोके, पेट्या, पाकिटे हीच शिंदे गटाची रणनीति असल्याची घणाघाती टीका संजय राऊत यानी केली आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, रणनीति म्हणजे नेमके काय करतायत? हे तुम्हाला माहिती आहे का? खोके, पेट्या, पाकिटे कशी आणि कुठे वाटायची आणि कुणाला कसे विकत घ्यायचे, हीच त्यांची रणनीति असते. रणनीति आता मतदार ठरवतील. या लोकांचे काय करायचे हे मतदार ठरवतील. खोकेवाले कधी येतायत, याची आता मतदार वाट पाहत आहेत, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली. 

उद्या ते कसाबजी, अफजल गुरुजीही म्हणतील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी असा केला आहे. त्यावरून आता विरोधकांनी बावनकुळे यांच्यासहीत भाजपला घेरले आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी बावनकुळे यांना सुनावले. त्यांच्या पोटात होतं ते ओठावर आलं म्हणूनच त्यांनी औरंगजेबजी असा उल्लेख केला. उद्या कसाबजी म्हणतील. मग अफजल गुरुजी म्हणतील, अफजल खानजी म्हणतील. मग शाहिस्ते खानजी म्हणतील. यावरच त्या पक्षाची रोजीरोटी सुरू आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून विशेष टीम तयार करण्यात आली आहे. १२ जणांच्या टीममध्ये खासदार, आमदार आणि माजी नगरसेवकांसह महिला नेत्यांचा समावेश आहे. गजानन कीर्तिकर, दीपक केसरकर, राहुल शेवाळे, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे, यशवंत जाधव, शीतल म्हात्रे, आशा मामिडी, कामिनी शेवाळे यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :संजय राऊतमुंबई महापालिका निवडणूक २०२२एकनाथ शिंदे