Maharashtra Politics: पत्राचाळ कथित गैरव्यवहार प्रकरणात जामिनावर बाहेर आलेले शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अमोल कीर्तिकर यांनी संजय राऊतांची भेट घेतली. यावेळी संजय राऊतांनी शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला.
संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यातील मध्यावधी निवडणुकांबाबत दावा केला आहे. महाराष्ट्राचे राजकारण इतके अस्थिर झालेय की, उद्धव ठाकरे सांगतायत ते खरे आहे. मध्यावधी निवडणुकांची तयारी दिल्लीत सुरू झाली आहे. जे म्हणतात अमुक-तमुक आमच्यासोबत आहेत, त्यांच्यातच फूट पडण्याची तयारी सुरू झाली आहे. फुटिरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांनी भान ठेवले पाहिजे
महाराष्ट्रातून प्रकल्प जात आहेत. यावर कुणीच काही बोलत नाही. एकमेकांवर खापर फोडण्यापेक्षा हे प्रकल्प का जात आहेत? यावर महाराष्ट्र म्हणून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र बसून निर्णय घेणे गरजेचे आहे. राजकीय शत्रुत्व जपण्यासाठी उभा जन्म पडला आहे. पण महाराष्ट्र कमजोर झाला, तर आपण राजकारण करायलाही उरणार नाही याचे भान सत्ताधारी आणि विरोधकांनीही ठेवले पाहिजे, असा सल्ला संजय राऊतांनी दिला आहे.
दरम्यान, अमोल कीर्तिकर कडवट शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेसोबतच आहेत. गजानन कीर्तिकरांनी घेतलेल्या निर्णयात ते सहभागी नाहीत. त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. अशाच कडवट लोकांसोबत शिवसेनेचा प्रवास पुढे जाणार आहे. आम्हाला अनेक लोक सोडून गेले. पण गजानन कीर्तिकर सोडून गेल्याचे दु:ख आम्हाला जास्त आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"