Maharashtra Politics: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशमधील गुंतवणूक वाढीसंदर्भात योगी आदित्यनाथ यांचा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. मुंबई दौऱ्यावर असताना योगी आदित्यनाथ अनेक उद्योगपतींशी चर्चा करणार आहेत. यावरून विरोधकांकडून योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा आणि रोड शोवरून निशाणा साधला आहे.
आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात योगी आदित्यनाथ टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी समूह, पिरामल, गोदरेज, आदित्य बिर्ला समूह, महिंद्रा बाँबे डाइंग, जेएसडब्ल्यू समूह, एशियन पेंट्स,हिरानंदानी, कोका-कोला, मारुती सुझुकी आणि ओस्वाल इंडस्ट्रीज यासह अनेक बड्या उद्योगपतींची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली असून, योगी आदित्यनाथ मुंबईत रोड शो का करत आहेत? अशी विचारणा केली आहे.
राजकारणाचे धंदे बंद करा
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री दावोसला जात आहेत. तिथे गुंतवणुकदारांची परिषद असते. तिथे जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रोड शो करणार आहेत का? गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दावोसच्या रस्त्यावर रोड शो होणार आहे का? मग यूपीच्या मुख्यमंत्र्यांना ताज हॉटेलसमोर रोड शो करण्याची गरज काय? हे राजकारणाचे धंदे बंद करा, या शब्दांत संजय राऊत यांनी फटकारले. आपण आलात तुमचा सन्मान आहे. तुम्ही सन्मानाने निघून जा. उद्योगपतींशी चर्चा करा. तुमच्याविषयी प्रेम आदर आहे तो राहील. फक्त राजकीय उद्योग करू नका. तुम्ही तुमच्या राज्याच्या विकासासाठी मुंबईचे योगदान घ्यायाल आला आहात तर रोड शो कशासाठी? अशी विचारणाही संजय राऊत यांनी केली आहे.
दरम्यान, फिल्म इंडस्ट्री ही संपूर्ण देशाची आहे. दादासाहेब फाळके यांनी महाराष्ट्रात फिल्म इंडस्ट्रीची मुहूर्तमेढ रोवली. योगी मुंबईत आलेत. त्यांना कुणालाही भेटू द्या. योगींना फिल्म सिटी बनवायची असेल तर स्वागत आहे. सर्व देशातील राज्यांमध्ये फिल्म इंडस्ट्री झाली पाहिजे. दक्षिणेतही आहे. योगींनीही करावी. स्वागत आहे. पण मुंबईतील फिल्म इंडस्ट्री अशी कोणी खेचून नेऊ शकते का? असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"