आता संजय राऊतांचे धाकटे भाऊ अडचणीत; आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस, नेमके प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 06:17 PM2023-10-05T18:17:00+5:302023-10-05T18:21:38+5:30
Sandeep Raut: संजय राऊतांच्या धाकट्या बंधूंना आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
Sandeep Raut: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळाप्रकरणी जामिनावर आहेत. यानंतर आता संजय राऊतांचे यांचे धाकटे भाऊ संदीप राऊत यांना आर्थिक गुन्हे शाखेने एका घोटाळ्यातील चौकशीसाठी नोटीस बजावली असून, शुक्रवारी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्यानंतर आता संदीप राऊत यांच्या अडचणीत आल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खिचडी घोटाळा प्रकरणी संदीप राऊत यांना आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावली आहे. संदीप राऊत हे संजय राऊत यांचे धाकटे बंधू आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खिचडी घोटाळा प्रकरणात याआधी उद्धव ठाकरे गटातील अमोल कीर्तिकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सुरज चव्हाण यांची चौकशी करण्यात आली आहे.
खिचडी घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला
मुंबई महानगरपालिकेच्या १०० कोटींच्या कथित बॉडी बॅग प्रकरणानंतर आता खिचडी घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर, सुनिल बाळा कदम, तत्कालीन सहआयुक्त, नियोजन, बीएमसी, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सचे भागीदार, इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आता संजय राऊत यांचे धाकटे भाऊ संदीप राऊत यांची चौकशी होणार आहे.
दरम्यान, गरीब कामगारांसाठी, ज्यांचे स्वत:चे मुंबईत घर नाही त्यांना लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. भारत सरकारचेही त्याला समर्थन होते. कामगारांना खिचडी देण्याचे कॉन्ट्रॅक्ट ५२ कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेने दिले होते. सुरुवातीच्या ४ महिन्यात ४ कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असे मुंबई महानगरपालिकेचे म्हणणे आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याची चौकशी सुरू आहे.