“खुद्दार ते खुद्दारच! शिवसेना ही मर्द मावळ्यांची भगवद्गीता, मग कितीही मांजरे आडवी येऊ द्या”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 07:59 AM2023-06-19T07:59:40+5:302023-06-19T08:01:33+5:30
शिवसेना ही वाघाची डरकाळी आहे. महाराष्ट्रात डरकाळीच्या नावाखाली गद्दार लांडग्यांचे पिचकणे सुरू आहे, अशी सडकून टीका करण्यात आली आहे.
Shiv Sena Thackeray Group: शिवसेनेचा वर्धापन दिन उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून साजरा केला जात आहे. यावरून ठाकरे गटाकडून शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रात ५७ वर्षे वाघाचीच डरकाळी घुमत आली आहे. घुमत राहणार आहे. महाराष्ट्रातील मिंध्या कोल्ह्या-लांडग्यांचे केकाटणे वाघाच्या डरकाळीत विरून जाणार आहे. शिवसेना ही मर्द मावळ्यांची भगवद्गीता आहे. दिवंगत बाळासाहेब शरीराने आपल्यात नाहीत. पण त्यांचा अंगारी विचार हाच आपला अग्निपथ आहे. खरी शिवसेना तीच, जिच्या पोटात एक ओठात दुसरे नाही. इथे सकाळी निष्ठेच्या आणाभाका घ्यायच्या व रात्रीच्या अंधारात सुरतचा ढोकळा खायला पळून जायचे हे दळभद्री उद्योग शिवसेनेच्या रक्तात नाहीत. शिवसेनेची घोडदौड यापुढेही सुरूच राहील. ती याच प्रामाणिकपणामुळे. मग कितीही मांजरे आडवी येऊ द्या, या शब्दांत ठाकरे गटाने हल्लाबोल केला.
स्थापनेपासून शिवसेना संकटाचा आणि फाटाफुटीचा सामना करीत आहे; पण कोणी कितीही बेइमानी केली तरी ‘सामना’ शिवसेनाच जिंकत आली व सर्व महाराष्ट्रद्रोही कचरा उडावा तसे उडून गेले. हा आजचा वर्धापन दिन खासच म्हणावा लागेल. वर्षभरापूर्वी याच काळी शिवसेनेतील ४० बेइमानांनी आईच्या दुधाशी गद्दारी केली. ते भाजपास सामील झाले व ‘आम्हीच खरी शिवसेना’ असे मिरवू लागले. अर्थात शिवसेनेच्या स्थापनेपासून असे प्रतिशिवसेना स्थापणारे आले आणि काळाच्या ओघात नष्ट झाले, अशी टीका ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केली आहे.
सोन्यापुढे लोखंड कसे टिकणार?
सोन्यापुढे लोखंड कसे टिकणार? चोरलेल्या आमदार, खासदारांचा आकडा म्हणजे वैचारिक बैठक नव्हे. शिवसेनेच्या जडणघडणीत, पर्यायाने महाराष्ट्राच्या जडणघडणीत तुमचे योगदान काय? शिवसेना स्थापन झाली तेव्हा तुम्ही गोधडय़ा भिजवत होता. आता म्हणे ‘आम्हीच शिवसेनेचे निर्माते!’ हा असा आव आणणाऱयांच्या कमरेवरची वस्त्रं दिल्ली दरबारी उभे राहताच भीतीने भिजतात. यांचे नेते मोदी आणि शहा, जे महाराष्ट्राच्या अस्मितेचा पायाच उखडून टाकायला निघाले आहेत. तर हे प्रतिवालेही त्यांच्या प्रतिशिवसेनेचा म्हणे वर्धापन दिन साजरा करीत आहेत. सर्व खेळ पैशांचा. दिल्लीच्या चरणी थैल्या वाहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळवणारे शिवसेनेचे नाव घेतात तेव्हा शिवसेनेसाठी रक्त सांडणारे असंख्य आत्मे चिडून तडफडत असतील, असा निशाणा अग्रलेखातून साधण्यात आला आहे.
शिवसेना ही वाघाची डरकाळी आहे
शिवसेना ही वाघाची डरकाळी आहे. ही डरकाळी घुमू नये यासाठी आजवर का कमी प्रयत्न झाले? गद्दार लांडग्यांना वाघाचे कातडे पांघरून नकली वाघ बनविण्याचे प्रयोग महाराष्ट्रात अनेकदा झाले; पण ते सगळे प्रयोग मराठी माणसानेच बंद पाडले. आताही ४० गद्दार आणि खोकेबहाद्दरांची पात्रे गोळा करीत महाराष्ट्रात नकली वाघांचा एक ‘मिंधे प्रयोग’ जनतेच्या माथी मारण्यात आला आहे. जनतेने या प्रयोगाकडे पाठ फिरवली असली तरी ही ४० पात्रे स्वतःच स्वतःला नाचवून घेत आहेत. शेवटी ईडी सरकारच्या खाल्लेल्या मिठाला जागायला हवे. त्यासाठी ‘मिंधे’पणाचा आणि ‘गद्दारी’चा वर्धापन दिन साजरा करायलाच हवा, असा टोला लगावण्यात आला.
दरम्यान, ईडी सरकार आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या ‘उधारी’च्या मालावर या ‘मिंधे’ गटाची राजकीय दुकानदारी सुरू आहे. मिंधे गटाची ही राजकीय मजबुरी आहे. त्या मजबुरीतूनच खऱया वाघाची नक्कल करण्याची, स्वतःला विचारांचे वारसदार वगैरे म्हणवून घेण्याची नौटंकी सुरू आहे. पण शेवटी नकली ते नकली आणि असली ते असली! गद्दार ते गद्दार आणि खुद्दार ते खुद्दारच! महाराष्ट्रातील जनता खुद्दार कोण आणि महाराष्ट्रधर्माच्या पाठीत खंजीर खुपसणारे गद्दार कोण हे ओळखते. महाराष्ट्राचा खरा वाघ आणि महाराष्ट्राशी बेइमानी करणारे ‘मिंधे’ वाघ यातील फरक जनता ओळखून आहे. डरकाळी फोडतो तो वाघ असतो आणि ओरडतो तो लांडगा. महाराष्ट्रात सध्या डरकाळीच्या नावाखाली गद्दार लांडग्यांचे पिचकणे सुरू आहे, अशी सडकून टीका करण्यात आली आहे.