Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून, शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत आहेत. यातच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जितेंद्र आव्हाड यांना पाठिंबा दर्शवला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
ठाण्यात पुलाच्या उद्घाटन सोहळ्यात खासदार श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांची शाब्दिक बाचाबाची झाली होती. हा सगळा प्रकार पाहता, २००९ पासून ज्या पुलाच्या बांधणीसाठी जितेंद्र आव्हाड प्रचंड आग्रही होते. यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे ज्यांनी पाठपुरावा केला, त्यांच्या नावाने त्या कार्यक्रमात घोषणा दिल्या जाणे हे अत्यंत स्वाभाविक होते. पण या गोष्टीचा राग मनात असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महिलेच्या सांगण्यावरून विनयभंगाची केस दाखल करावी, असा गंभीर आरोप करत महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर किती खाली जाऊ शकतो. याचे हे उदाहरण आहे, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री महोदयांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा खूप मोठ्या
विशेषतः तो व्हिडिओ नीट काळजीपूर्वक पाहिला, तर त्यासंदर्भात इतका अश्लाघ्य आरोप लावताना सन्माननीय मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या कारकिर्दीबद्दल जराही काही वाटले नाही का, अशी विचारणा करत, मला माहिती आहे की, मुख्यमंत्री महोदयांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा खूप मोठ्या आहेत. पण या राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी तुम्ही इतरांचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करत असाल, तर प्रगल्भ महाराष्ट्र हे अजिबात खपवून घेणार नाही, अशी घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी केली.
होय, मी जितेंद्र आव्हाडांसोबत, ते भाऊ असल्याचा अभिमान
या महाराष्ट्राची वैचारिक उंची एवढी मोठी आहे की, महाराष्ट्रात अशा अत्यंत सवंग आणि उथळ पद्धतीने विशेषतः सूडबुद्धीचे जे राजकारण सुरू आहे. त्या सूडबुद्धीच्या राजकारणाला कधीही थारा मिळू शकत नाही. आम्हाला अभिमान आहे की, जितेंद्र आव्हाड आमचे भाऊ आहेत. जितेंद्र आव्हाडांनी सुरू केलेली लढाई न्याय्य हक्कासाठीची आहे. त्यामुळे होय, मी आव्हाड यांच्यासोबत आहे, असे सांगत सुषमा अंधारे यांनी जितेंद्र आव्हाड यांना जाहीर समर्थन दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"