काल मुंबईच्या तिजोरीवर पहिला हात टाकला, मुंबईकरांनो सावध व्हा; ठाकरे गटाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 03:47 PM2023-02-05T15:47:20+5:302023-02-05T15:48:52+5:30
केंद्राच्या मित्राने देशार बाजार उठवला आता महाराष्ट्राचा तथाकथित मित्र मुंबईचा बाजार उठवेल अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
मुंबई - जगातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी मांडला. जवळपास ५० हजारांहून अधिक कोटींचा हा अर्थ संकल्प होता. मात्र या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मुंबईच्या तिजोरीवर पहिला हात टाकण्यात आला, मुंबईकरांनो सावध व्हा असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, काल मुंबईच्या तिजोरीत पहिला हात टाकण्यात आला. जवळपास १२ हजार कोटी रुपये महापालिकेच्या ठेवीमधून काढण्याची तरतूद काल महापालिकेच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. केंद्राच्या मित्राने देशार बाजार उठवला आता महाराष्ट्राचा तथाकथित मित्र मुंबईचा बाजार उठवेल. मुंबईकरांनो सावध व्हा असं सांगत अप्रत्यक्षपणे राऊतांनी भाजपा-शिंदे गटावर आरोप केला आहे.
काल मुंबईच्या तिजोरीमध्ये पहिला हात टाकण्यात आला
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 5, 2023
जवळपास १२ हजार कोटी रुपय महापालिकेच्या ठेवीमधून काढण्याची तरतूद काल महापालिकेच्या बजेट मध्ये करण्यात आली.
केंद्राच्या मित्राने देशाचा बाजार उठवला आता महाराष्ट्राचा तथाकथित मित्र #मुंबई चा बाजार उठवेल.😡😡
मुंबईकरांनो सावध व्हा
विकासकामांसाठी सोडणार ११,६१५ कोटींच्या ठेवींवर पाणी
मुंबई महापालिकेने शनिवारच्या अर्थसंकल्पात विकासकामांसाठी थेट मुदतठेवींना हात घातला असून, यंदाच्या अर्थसंकल्पात महापालिकेच्या एकूण ८८ हजार कोटी रुपयांच्या ठेवींपैकी ११ हजार ६१५ कोटींच्या ठेवी मोडण्याची धक्कादायक तरतूद केली आहे. मुंबई महापालिकेच्या ठेवींना हात घातल्यानं त्यावरूनच आता येत्या काळात याचे मोठे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. शिवसेनेसह राज्यातील विरोधी पक्ष यावरून महापालिका आणि राज्य सरकारला लक्ष्य करण्याची चिन्हे आहेत.
जानेवारीत विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी मुंबईत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासकामांना निधी अपुरा पडणार नाही, अशी ग्वाही दिली होती. तसेच गरज पडल्यास मुंबईकरांसाठी राखीव निधीतून पैसे खर्च केले पाहिजे, अशी सूचनाही केली होती. आता प्रशासनाने विविध प्रकल्पांसाठी राखीव निधीतून तब्बल ११ हजार ६१५.०९ कोटींचा निधी वापरण्याचे ठरवले आहे.
मुंबई महापालिकेच्या ठेवी ८८ हजार कोटींवर
शनिवारी प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी महापालिकेचा तब्बल ५२ हजार कोटींचा अर्थसंकल्प मांडला. मुंबई महापालिका जगातील श्रीमंत महापालिका मानली जाते. अनेक प्रमुख कंपन्याची कार्यालये मुंबई शहरात आहेत. देशातील सर्वाधिक कर महापालिकेतून भरला जातो. मुंबई महापालिकेच्या ठेवी ८८ हजार कोटींच्या घरात आहेत. गेल्या ३० वर्षापासून महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता काबीज करण्यासाठी भाजपा सर्वोत्तपरी प्रयत्नशील आहे.