मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. ही धमकी एका फोन कॉलच्या माध्यमाने देण्यात आली असल्याची माहिती स्वतः संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी दिली आहे. धमकीच्या फोननंतर राऊतांनी गृहविभागाला प्रश्न विचारत सरकारला धारेवर धरले. या सरकारमध्ये गुडांना संरक्षण दिले जात असून जे धमक्या देतात त्यांनाच सुरक्षा पुरवली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
"आम्ही गृहविभागाला कळवायचं काम केलं आहे, पण ते गुडांनाच संरक्षण देतील. मी प्रत्येकवेळी याबाबत माहिती दिली आहे. सरकारमध्ये दम नाही ते हतबल आहे. माझं कर्तव्य म्हणून मी धमकीची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. कारण परत त्यांनी म्हणायला नको की आम्हाला काही कळवलं नाही", असे राऊतांनी सांगितले. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
संजय राऊतांची टीकातसेच या धमकीची माहिती मुंबई पोलिसांना दिली आहे पण आमच्या जीवाचं बर वाईट व्हावं हेच सरकारला हवं असल्याची टीका देखील राऊतांनी केली. संजय राऊतांना आलेला धमकीचा फोन कॉल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात धमकी देणारी व्यक्ती संजय राऊतांना सकाळची पत्रकार परिषदत बंद करायला सांगत आहे. तसेच न ऐकल्यास गोळी मारण्याची धमकी देत आहे. सुनिल राऊतांचे भाऊ आणि आमदार सुनिल राऊत यांना हा धमकीचा फोन आला होता.
अज्ञात व्यक्तीकडून राऊत बंधूंना जीवे मारण्याची धमकी सुनील राऊत म्हणाले, माझ्या मोबाईलवर कॉल करून मला आणि संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यात संजय राऊतांना सांगा की, रोज सकाळी माध्यमांसोबत बोलणे बंद करा. नाहीतर तुम्हाला आणि संजय राऊत यांना दोघांनाही जीवे मारू, अशी धमकी देण्यात आली आहे.