Join us

युतीमुळे ठाण्यातील शिवसैनिकामध्ये अंतर्गत नाराजी सुरू; अनेक पदाधिकारी देणार राजीनामा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 7:36 PM

ठाणे शहर मतदारसंघात विद्यमान आमदार संजय केळकर हे भाजपाचे आहेत. 2014 च्या निवडणुकीत संजय केळकर यांनी 12, 588 हजारांचे मताधिक्य घेतलं होतं.

ठाणे - ठाणे शहर विधानसभा मतदार संघात शिवसेनाला उमेदवारी न मिळाल्यास शिवसैनिक पदाधिकारी राजीनामा देणार असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपा युतीला मोठ्या बंडखोरीला सामारं जावं लागण्याची चिन्हे आहेत. 

युतीमुळे शिवसैनिक प्रचंड नाराज झालेले आहेत. विद्यमान आमदार संजय केळकर यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेच्या इच्छुकांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसैनिक भाजप उमेदवाराचे देखील काम करणार नाही. युतीचा धर्म म्हणून ठाण्यात शिवसैनिकांला ठाणे शहराची जागा सोडावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली. सभागृह नेते नरेश म्हस्केसह सेनेचे नगरसेवक संजय भोईर देखील ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात सेनेच्या तिकिटासाठी इच्छुक आहेत. 

ठाणे शहर मतदारसंघात विद्यमान आमदार संजय केळकर हे भाजपाचे आहेत. 2014 च्या निवडणुकीत संजय केळकर यांनी 12, 588 हजारांचे मताधिक्य घेतलं होतं. तर 2019 च्या लोकसभेत युतीचे उमेदवार राजन विचारे यांना या मतदारसंघातून 1 लाख 30 हजार मतदान झालं होतं. मात्र विधानसभेत शिवसैनिकांनी या मतदारसंघात दावा केलेला आहे. 

ठाण्यापाठोपाठ कल्याणमध्येही शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपा आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर कल्याण पश्चिम व कल्याण पूर्व या दोन्ही ठिकाणी भाजपचा उमेदवार दिल्यास शिवसैनिक गप्प बसणार नाहीत असं सांगत शिवसेना शहर कार्यालयाच्या बाहेर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र या घोषणाबाजीत शिवसैनिकांनी दिलेल्या विशेष घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. बाळासाहेबांना मानणाऱ्या शिवसैनिकांचा विजय असो या घोषणेने अनेकांच्या भूवया उंचावल्या. या घोषणेवरुन कुठेतरी शिवसैनिकांच्या मनात बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंना मानणारा गट वेगळा पडलाय का असा प्रश्न उपस्थित होतो. या वादाची पहिली ठिणगी कल्याणमध्ये पेटली आहे. त्यामुळे युतीमुळे शिवसेना-भाजपाच्या इच्छुकांची डोकेदुखी झाल्याचं पाहायला मिळतंय.  

टॅग्स :शिवसेनाभाजपाठाणे