मुंबई - उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आणि महाविकास आघाडीविरोधात बंड पुकारून गुवाहाटीला गेलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून टीकेची झोड उठवण्यात येत आहे. दरम्यान, बंडखोर म्हणवून घेणाऱ्या झाडी-डोंगरातील गटाची अवस्था ही पाकिस्तानसारखी होईल, अशी शेलकी टीका आजच्या सामनामधून करण्यात आली आहे.
सामनाच्या आजच्या अग्रलेखात लिहिले आहे की, शिवसेनेच्या स्थापनेनंतर २८० सेना निर्माण झाल्या. मात्र गेल्या ५६ वर्षांत टिकली ती शिवसेना. गुवाहाटीमध्ये डोंगर, झाडी, नदी, हाटीलची मजा घेत बसलेल्या आमदारांना शिवसेनेच्या या चमत्काराची जाणीव नसेल असं कसं मानायचं? भाजपा आपल्या मित्रपक्षांचा घास गिळूनच शांत होतो, हे आता झाडीतल्या आमदारांना आणि नेत्यांना लवकरच कळेल. या आमदारांच्या गटाला महाशक्तीचा अजगरी विळखा पडला आहे. हा अजगर अख्खा बोकड गिळावा, तसे या गटाला गिळून पुढे जाईल, असा टोला सामनामधून या बंडखोरांना लगावण्यात आला आहे.
भारताला तोडून बॅ. जीनाने पाकिस्तान निर्माण केला. पण तो देश राहिला नसून, पृथ्वीवरचे एक डबकेच बनला आहे. तशीच अवस्था या बंडखोर वगैरे म्हणवून घेणाऱ्या झाडी-डोंगरातील गटाची होणार आहे. म्हणून ज्यांचा आत्मा आजही जिवंत आहे, त्यांनी या डबक्यातून बाहेर पडावे आणि महाराष्ट्राच्या स्वर्गात यावे. गुवाहाटीमध्ये झाडी-डोंगर-हाटील वगैरे आहे. पण महाराष्ट्रात शिवराय आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत. शाहू-फुले-आंबेडकरांची भूमिका आहे. तेव्हा डबक्यातून बाहेर पडा हे पहिले सांगणे आणि भाजपाने या डबक्यात उडी मारू नये, हे दुसरे सांगणे. महाराष्ट्रात विजय भगव्याचाच होईल. पंचावन्नचे एकशे पंचावन्न करण्याची ताकद मऱ्हाटी मनगटात आहे. विचारांचा विजय यालाच म्हणायचे असते, असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.