Maharashtra Politics: “खोके सरकारला लाज वाटत नाही, बळीराजा अडचणीत पण हे राजकारणात अडकलेत”; आदित्य ठाकरेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 08:49 AM2022-10-26T08:49:02+5:302022-10-26T08:49:42+5:30

Maharashtra News: जनतेचा आवाज कुठेही ऐकला जात नाही. फक्त खोटे बोलत राहायचे, हेच सरकारचे धोरण आहे, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी केली.

shiv sena uddhav balasaheb thackeray group leader aaditya thackeray criticised eknath shinde and bjp devendra fadnavis govt | Maharashtra Politics: “खोके सरकारला लाज वाटत नाही, बळीराजा अडचणीत पण हे राजकारणात अडकलेत”; आदित्य ठाकरेंची टीका

Maharashtra Politics: “खोके सरकारला लाज वाटत नाही, बळीराजा अडचणीत पण हे राजकारणात अडकलेत”; आदित्य ठाकरेंची टीका

Next

Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्याच्या राजकारणात अनेक मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचे नेते सातत्याने विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत असून, बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट आणि भाजप टीकाकारांना प्रत्युत्तर देत आहेत. परतीच्या पावसामुळे झालेले मोठे नुकसान आणि दिवाळसण या कात्रीत बळीराजा अडकलेला आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नसल्यावरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. खोके सरकार अजूनही राजकारणात अडकलेले आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना अजूनही मदत केलेली नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 

दिवाळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. या सरकारला ‘घोषणा सरकार’, ‘खोके सरकार’ अशी अनेक नावे मिळाली आहेत. पण यांना कोणतीही लाज वाटत नाही. आपण काम करणे गरजेचे आहे, हेही ते विसरून गेले आहेत. खरे म्हणजे सणासुदीपासून राजकारण बाजुला ठेवायला हवे. पण सर्वत्र उधळपट्टी सुरू आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. 

फक्त खोटे बोलत राहायचे, हेच सरकारचे धोरण आहे

महागाईवर, रुपयाच्या पडत्या किमतीवर, शेतकऱ्यांच्या नुकसानीवर, बेरोजगारीवर बोलायला हवे. पण प्रश्नांवर कुणीही बोलायला तयार नाही. केवळ उधळपट्टी सुरू आहे. निव्वळ घोषणा दिल्या जात आहेत. दहिहंडीच्या काळातही एवढ्या घोषणा दिल्या, मात्र त्यातील एकही घोषणा अंमलात आणली नाही. फक्त खोटे बोलत राहायचे, हेच सरकारचे धोरण आहे, असा आरोप आदित्य ठाकरेंनी यावेळी केला. 

पण जनतेचा आवाज कुठेही ऐकला जात नाही

खरे मुख्यमंत्री कोण आहेत? हे सरकार अजूनही राजकारणातच अडकले आहे. घटनाबाह्य सरकारने कामही करायचे असते, हे त्यांना अजूनही जाणवलेले नाही. राज्यात केवळ राजकीय घोषणा दिल्या जात आहेत. पण जनतेचा आवाज कुठेही ऐकला जात नाही. ४० दिवसांनी पहिल्या मंत्र्यांची यादी जाहीर झाली होती. पालकमंत्री जाहीर होण्याआधी बंगल्याचे वाटप झाले होते. हे सरकार घटनेच्या विरोधात आहे हे मान्य करायला हवे. घटनाबाह्य सरकार निर्णय घेत आहे हे दुर्दैवी आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

दरम्यान, राज्यातील प्रत्येक महामंडळाच्या बस स्थानकावर शिंदे सरकारचे होर्डिंग्स लागले आहेत. या होर्डिंगसाठी पैसे दिले आहेत की नाही? हे अजूनही माहीत नाही. दिले असतील तर कुणी दिले? आणि दिले नसतील तर याची नुकसानभरपाई कोण करणार? हेही माहीत नाही. शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर बॅनर लावले आहेत. पण महापालिकेकडून कुठेही कारवाई केली जात नाही. एवढे सगळे राजकीय होर्डिंग्स पाहून मला मळमळायला लागले आहे, असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shiv sena uddhav balasaheb thackeray group leader aaditya thackeray criticised eknath shinde and bjp devendra fadnavis govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.