Maharashtra Politics: दिवाळीनिमित्त मनसेने आयोजित केलेल्या शिवाजी पार्कवरील कार्यक्रमाला पक्षाचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हजेरी लावली होती. यानंतर भाजप, शिंदे गट आणि मनसे यांच्या महायुतीबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्या. या तिन्ही पक्षातील नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. यावरुन विरोधकांकडूनही टीका केली जात आहे. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने राज ठाकरेंसह भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीमध्ये भाजप आणि शिंदे गटाने मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत केल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने वरळीत दिवाळीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सुनील शिंदे यांनी भाजप, मनसे आणि शिंदे गटावर टीका केली आहे.
दिवा विझताना तेजोमय होतोच
भाजप-मनसे-शिंदे गटाच्या महायुतीवर बोलताना, दिवा जेव्हा तेजोमय होतो, तेव्हा तो विझण्याच्या तयारीत असतो. अशा स्थितीमध्ये कोण कोणाला आधार देऊन मोठे करत आहे. बुडत्याला काडीचा आधार अशी स्थिती आहे. मात्र महाराष्ट्र आणि मुंबईच्या जनतेला हे चांगले माहिती आहे. जनता योग्य वेळी उत्तर देईल, या शब्दांत सुनील शिंदे यांनी मनसे आणि राज ठाकरेंवर हल्लाबोल केला.
राज्यातील समस्या सोडवण्यावर सरकारचा भर नाही
राज्यात सध्या अनेक समस्या आहेत. त्या समस्या कशा सोडायच्या याचा दृष्टीकोन सध्याच्या सरकारकडे नाही. ते केवळ वरळी मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रीत करत आहेत. यावरून त्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचे काम किती मोठे असावे याची कल्पना येते. आम्ही फक्त आता निवडणुकीची वाट पाहात आहोत. निवडणुकीतून दाखवून देऊ, असा इशारा सुनील शिंदे यांनी दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"