"एकेकाळी भाजपची लोक मातोश्रीवर यायची आणि आता...", उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 05:09 PM2023-06-18T17:09:09+5:302023-06-18T17:09:39+5:30
शिवसेना ठाकरे गटाकडून वर्धापनदिनानिमित्त आज मुंबईत राज्यव्यापी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाकडून वर्धापनदिनानिमित्त आज मुंबईत राज्यव्यापी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी आपला जुना मित्र आणि सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली. एक काळ असा होता जेव्हा मातोश्रीवर भाजपची लोक यायची पण आता भाजपसोडून इतर सर्व पक्षांची लोक यायला लागली आहेत. कारण भाजपला शिवसेनेचे महत्त्व कळले नाही. 'जो दुख में साथ दे वह फ़रिश्ते होते हैं' असं म्हणत ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले.
"आता भाजपसोडून सर्व पक्षाचे लोक मातोश्रीवर येत आहे, कारण भाजपला फक्त सुखामध्ये सोबत येतात तेवढेच पाहिजे आहेत. पण उद्या तुम्ही जेव्हा सत्ता गेल्यानंतर रस्त्यावर फिराल तेव्हा तुम्हाला विचारायला एकही मित्र येणार नाही. मी २३ तारखेला पाटण्याला जात आहे. पत्रकार विचारतात की, विरोधकांची एकजुट होईल का? पण पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल? मी म्हणतो तुला काय करायचंय. विरोधी पक्ष कोण आहे, कोणाचा विरोध? केवळ भाजपविरूद्ध लढायचं म्हणून आम्ही विरोधी पक्ष नसून होणारी एकजुट ही स्वातंत्र्यप्रेमींची एकजुट असेल", असे ठाकरेंनी नमूद केले.
ज्याला माझी भारतमाता स्वतंत्र हवी आहे, त्यांना सर्वांना मी आवाहन करतो की, एकत्र या आणि या भारतमातेला भाजपकडून सोडवा, असेही ठाकरेंनी सांगितले. देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर देताना त्यांनी म्हटले, "देवेंद्र फडणवीसांची परिस्थिती खूप हलाखीची आहे. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस. सावकरांचा धडा वगळला याबद्दल शिवसेना निषेध करतेच. पण ज्या सावरकरांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कष्ट भोगले. मरणयातना सहन करून सावरकांनी जो देश स्वतंत्र केला, तो देश ज्याचा स्वातंत्र्यसंग्रामात काडीचाही संबंध नव्हता. अशी एखादी विचारधारा तिच्या जोखडाखाली आणू इच्छिते त्याच्याबद्दल तुमचं मत काय? सावरकरांनी ज्या हालअपेष्टा सहन केल्या त्या देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्यासाठी सहन केल्या होत्या का?."
फडणवीसांना आव्हान
तसेच जर सावरकर प्रेमी असाल तर देश बुडाखाली घेणाऱ्या तुमच्या नेत्याचा धिक्कार करा, असे आव्हान ठाकरेंनी फडणवीसांना दिले. आम्ही एकत्र येतोय ते देश आणि देशाची लोकशाही आबाधित ठेवण्यासाठी एकत्र येत असल्याचे ठाकरेंनी अधिक सांगितले.