"शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचं नाव बदलून 'रडकी सेना' असं ठेवावं"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 12:50 PM2022-10-14T12:50:34+5:302022-10-14T12:51:28+5:30
या निवडणुकीत भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना-आरपीआय गटाच्या उमेदवाराचा २५-३० हजार मताधिक्यांनी विजय होणार आहे असा विश्वास भाजपा नेते शेलारांनी व्यक्त केला.
मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचं नाव बदलून रडकी सेना असं ठेवावं. सत्तेत असताना केंद्र सरकारच्या नावानं रडत होते. आता विरोधी पक्षात असताना कधी न्यायालयाच्या नावानं, कधी निवडणूक आयोगाच्या नावानं रडतात. उद्या अंधेरीत पराभूत झाला तर अंधेरीच्या जनतेच्या नावानं रडतील त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना ही रडकी सेना आहे असा टोला मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव-आदित्य यांना लगावला आहे.
आशिष शेलार म्हणाले की, मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्थानिकांचा महापूर आला आहे. आमच्यासमोर १० पक्षांना सोबत घेऊन १० तोंडाचा रावण उभा आहे. ते उपरे बाहेरून लोक बोलवतात. अनिल परब यांच्यासह बाहेरचे लोक आणि मुरजी पटेल, स्थानिक असा हा संघर्ष आहे. या निवडणुकीत भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना-आरपीआय गटाच्या उमेदवाराचा २५-३० हजार मताधिक्यांनी विजय होणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सहानुभूती मिळवण्याचं षडयंत्र
तर अंधेरी पूर्व मतदारसंघात प्रत्येक महिला मुरजी पटेल यांना काका म्हणते. प्रत्येक नागरीक काकांना भेटतोय. ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना अशी आहे. सहानुभूतीच्या जोरावर निवडणूक लढवली जात आहे. ऋतुजा लटकेंचा राजीनामा न स्वीकारण्यामागे ठाकरे गटाचं षडयंत्र होतं. या माध्यमातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता असा आरोप मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे गटाला लगावला.
अंधेरी पूर्व मतदारसंघात विजयी होणार - मुरजी पटेल
भाजपा घाणेरडे राजकारण करत नाही. पुढेही करणार नाही. ऋतुजा लटकेंचा राजीनामा ही तांत्रिक बाब होती. त्याचा भाजपाशी संबंध नव्हता. भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना-आरपीआय म्हणून मी प्रतिनिधित्व करणार आहे. विरोधकांचे आव्हान वाटत नाही. अपक्ष म्हणून मी ४८ हजार मते मी घेतली. आता तर भाजपासह युती पाठिंबा आहे. त्यामुळे ३० हजारांच्या मताधिक्याने निवडून येऊ. वेळोवेळी कोण मदत करतं हे अंधेरीतील जनतेला माहिती आहे. जनता विकासाला साथ देईल. गोरगरीब जनतेसाठी कोणी काम केले हे लोकांना माहिती आहे. अंधेरीच्या भविष्याची ही निवडणूक आहे. ६ तारखेला मुरजी पटेल आणि भाजपा काय आहे हे विरोधकांना कळेल असं सांगत मुरजी पटेल यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"